अखेर वणीतील ‘जनता कर्फ्यू’ स्थगित

जाणून घ्या कर्फ्युचा संपूर्ण घटनाक्रम व पडद्यामागचं राजकारण

0

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 29 जूनपासून 5 दिवस लागू करण्यात आलेला कर्फ्यू आज आयोजकांतर्फे अचानक मागे घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळूनही हा कर्फ्यू मागे घेण्यात आल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. खा. बाळू धानोरकरांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर या प्रकरणाला कलाटणी आली होती. त्यामुळे कर्फ्यू यशस्वी होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच वणीकरांनी मात्र या कर्फ्यूला भरभरून प्रतिसाद दिला. आता उद्या याला कसा प्रतिसाद मिळणार याकडे वणीकरांचे लक्ष असताना जनता कर्फ्यूला स्थगिती देण्यात आली.

सध्या छोट्या व्यापा-यांच्या समस्येमुळे तसेच प्रशासनाच्या विनंतीवरून हा जनता कर्फ्यू मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी पडद्यामागे मात्र चांगलेच खलबते झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे. कर्फ्यू जाहीर करण्याच्या वेळी हजर असलेल्या नेत्यानी आज स्थगितीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला दांडी मारल्यानेही याबाबत चांगलीच चर्चा होत आहे. तसेच एका नेत्याला तर आजच्या बैठकीचे आमंत्रणच नसल्याची माहिती आहे.

Birthday ad 1
Birthday ad 2
गांधी चौकातही शुकशुकाट

काय होता जनता कर्फ्यूचा घटनाक्रम…
शनिवारी दिनांक 27 जून रोजी दुपारी शहरातील काही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन जनता कर्फ्यू जाहीर केला. हा वणीकरांना एक आश्चर्याचा धक्का होता. अद्यापही संपूर्ण लॉकडाऊन संपलेले नसताना पुन्हा जनता कर्फ्यू लागल्याने शहरात कर्फ्यू हवा की नको यावर चांगलीच चर्चा रंगली. दोन्ही बाजूने याबाबत विविध चर्चा झाली. रविवारी संध्याकाळी खा. बाळू धानोरकर यांनी या प्रकरणात उडी घेतली. संध्याकाळी एसडीओ यांच्या दालनात काही नेत्यांची तसेच प्रशासकीय अधिका-यांची बैठक झाली. बैठकीनंतर खा. बाळू धानोरकरांनी या कर्फ्यूमध्ये प्रशासनाचा काहीही सहभाग नाही असे जाहीर करत हा कर्फ्यू पाळणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळी जनता कर्फ्युला वणीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दुपारी 10 नंतर व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन कर्फ्यूला प्रतिसाद दिला. रस्ते, मार्केट सारे ओस पडले होते. काही तुरळक भाजी, फ्रुट व चिकनचे दुकान वगळता व एक वाईन शॉप व दोन तीन बार वगळता सर्व दुकाने बंद होती. संध्याकाळी 4 वाजता बैठक घेण्यात आली. त्यात जनता कर्फ्यू मागे घेण्याचे जाहीर करण्यात आले.

पडद्यामागच्या घडामोडी…
वणीत कोरोनाचा सातवा रुग्ण सापडल्यानंतर वणीतील बड्या नेत्यांना एक कॉल गेला. दहा मिनिटांसाठी रेस्ट हाऊसवर या इथे सर्व आहे. असा मॅसेज देऊन सर्व नेते रेस्टहाऊसवर एकत्र आले. काही पत्रकारांनाही बोलवण्यात आले. प्रशासकीय अधिकारी आलेत. बैठकीत तडकाफडकी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असे जाहीर करण्यात आले. माडियातून ही बाब जेव्हा समोर आली तेव्हा केवळ परिसरातील ग्रामीण भागातही खळबळ उडाली.

या संपूर्ण घडामोडीत खा. बाळू धानोरकर यांना लोकप्रतिनिधी म्हणून गृहित धरण्यात आले नव्हते. दुस-या दिवशी नगराध्यक्ष यांच्या आवाहनाने वर्तमान पत्रातून कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत, त्या गाड्यांवरून सर्वांनी जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक आहे असे आवाहन करण्यात आले. जनता कर्फ्यूच्या धास्तीने लोकांनी रविवारी मार्केटमध्ये एकच गर्दी केली. वस्तू बेभाव विकल्या गेल्यात. आधीच लोकांनी आवश्यक ती खरेदी केल्याने आज लोक घराबाहेर पडलेच नाही. जे काही दुकाने सुरू होते ते दुकानं तिथे जाऊन बंद करण्यात आले.

सुरुवात फ्रुट व भाजी विक्रेत्यांपासून
फळ आणि भाजी या नाशवंत वस्तू असल्याने आज दुपारी नुकसान टाळण्यासाठी फळ व भाजी विक्रेत्यांनी या कर्फ्यूत सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली. त्यातच दुकानदारांनी स्वयंस्फुर्तीने एका दिवस दुकान बंद ठेवणे शक्य असले तरी रोज दुकान बंद करण्याबाबत असमर्थता दर्शवली. सर्व वणी बंद असताना निवडणुकीच्या काळात महिनाभर बंद असलेले वाईन शॉप सुरू असल्याने त्याबाबत शहरात चर्चा रंगू लागली. त्यामुळे उद्या काय होणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले होते.

दरम्यान आज चार वाजता रेस्ट हाऊसवर बैठक घेण्यात आली. या बैठकीकडे अनेक प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. संजय देरकर यांना तर या बैठकीचे निमंत्रणही नसल्याची माहिती मिळाली. त्यात प्रशासनाच्या विनंती वरून तसेच छोट्या व्यापा-यांमुळे जनता कर्फ्यू स्थगित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारीच खा. धानोरकरांनी प्रशासनाचा यात सहभाग नसल्याचे जाहीर केले असताना प्रशासकीय कारण देऊन स्थगिती का देण्यात आली? हे कोडे काही उलगडले नाही.

यशस्वी झाल्यानंतरही स्थगिती का?
याबाबत विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहे. कर्फ्यू जाहीर केल्यानंतर खासदार विरुद्ध नगराध्यक्ष असा राजकीय कलगीतुरा सुरू झाला. नगराध्यक्षांनी जनता कर्फ्युची प्रसिद्धी सुरू करताच दुसरीकडे खासदारांनी याला विरोध करत मिटिंग घेत प्रशासनाचा यात सहभाग नाही व कर्फ्यूत सहभागी होणेही बंधनकारक नाही असे जाहीर केले. खासदारांनी उडी घेताच दुसरीकडे बंद यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षांनी सर्व फिल्डिंग लावली. मात्र जनता कर्फ्यू सक्सेस झाला. जवळपास सर्व दुकाने बंद असताना त्यात वाईन शॉप सुरू असल्याने लोकांमध्ये वेगळा मॅसेज गेला. नगराध्यक्ष व कर्फ्यू समर्थकांना अभिनंदनाचे कॉल सुरू झाले.

त्यानंतर खासदारांनी आपले फासे फेकले. त्यांनी हे सर्व बंद करण्यासाठी थेट वरून प्रेशर आणल्याचे बोलले जात आहे. त्यातच काही व्यापा-यांनी पुढे दुकानं बंद ठेवण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. व्यापा-यांनी यातून माघार घेतल्यानंतर परिस्थिती अतीतटीची झाली. आधीच्या बैठकीत हजर असणा-या काही नेत्यांनीही बैठकीला दांडी मारली. ती का मारली? समर्थक जनता कर्फ्यूवर ठाम होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारही व्यापा-यांमुळे कर्फ्यू सुरू ठेवण्यास इच्छुक नव्हते. अखेर बैठकीत कर्फ्यूला स्थगिती देण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

जनता कर्फ्यू जरी स्थगित झाला असला तरी या सर्व घडामोडीत कुणी कुणाला धोबीपछाड दिली, कुणी बाजी मारली याबाबत शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

(हे पण वाचा…‘जनता कन्फ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज?)

‘जनता कन्फ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!