जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात 25 जुलै ते 31 जुलैपर्यत संचारबंदी व लॉकडाऊन कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वणीमध्येही सकाळी संध्याकाळी 5 पर्यंत असणारे लॉकडाउन कठोर करून त्याचा वेळ दुपारी 2 पर्यंत करण्यात आला होता. मात्र आता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊऩ शिथिल केला आहे. त्यामुळे आता वणीमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत बाजार व अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनचा हा वेळ उद्यापासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस या शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊऩसह संचारबंदी करण्यात आली होती. तर उर्वरित तालुक्यात लॉकडाऊन कठोर करण्यात आले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने निर्णय घेत संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदी असलेल्या शहरात लॉकडाऊन व संचारबंदी वाढवली आहे. तर हे शहर सोडता इतर भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.
वणीमध्ये दुकान सकाळी 6 ते संध्याकाली 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आधी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतचा वेळ होता. यात सकाळी 4 तास व दुपारी 3 तास अधिकचे देत शिथिलता आणली आहे. दूध विक्रेत्यांना संध्याकाळी 7 ते 8 घरपोच दूध वाटप करता येईल. शासकीय कामाकरिता व बँकीगचे कामे त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार सुरू राहतील. या दरम्यान नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळणं बंधनकारक असणार आहे. लॉकडाउनचा हा वेळ उद्यापासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.