सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: अकोला येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 2020 21 सत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही मुदत 21 ऑगस्ट 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. विभागात केवळ अमरावती आणि अकोला येथे हे दोनच मुलींचे आयटीआय आहेत. मुलींना औद्योगिक प्रशिक्षण देणारी अकोला जिल्ह्यातील ही एकमेव प्रशिक्षण संस्था आहे.
संपूर्ण राज्यातील कोणत्याही मुली किंवा महिला यात प्रवेश घेऊ शकतात. दिवसेंदिवस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होतात. अकोला येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आय. सी. टी. सी. एस. एम. बेसिक कॉस्मोटोलॉजी, बेकर अंड कन्फेक्शनर, कोपा, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, सेक्रेटिरियल प्रॅक्टिस इत्यादी व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश दिले जातील.
इच्छुकांनी www.admission.dvet.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य राम मुळे यांनी केले आहे. प्रवेशासंदर्भात काही अडचणी असल्यास माहिती आणि समुपदेशनासाठी रोज सकाळी दहा ते अकरा या कालावधीत संस्थेचे समुपदेशन केंद्र इथे भेट द्यावी. एका पत्रकातून शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी ही माहिती दिली आहे.