दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक
स्वातंत्र्यदिनाला वणी पोलिसांची मोठी कारवाई
विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4 वाजतादरम्यान मध्यवर्ती बँकेसमोर व दामले फैल परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 2760 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
दुपारी 3 वाजता सुमारास एक इसम मध्यवर्ती बँकेसमोर अवैधरीत्या दारू विक्री करीत असल्याची माहिती डीबी पथकास मिळाली. त्या ठिकाणी जाऊन बघितले असता एक इसम अवैधरीत्या दारू विक्री करीत असल्याचे दिसून आले. या ठिकाणाहून आनंद मारोती टोंगे (45) रा. गुरूनगर यास अटक करून त्याच्याकडून 960 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
याच दिवशी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दामले फैल येथे अवैधरीत्या देशी दारू विक्री करणाऱ्या शंकर राजना कुंभारकार याला अटक केली. त्याच्याकडून 1800 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही आरोपीवर कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पाठकाने केली.