साथीच्या रोगांनीग्रस्त जनावरांवर विनामूल्य उपचार करावेत
माजी युवा सेना तालुका प्रमुख सचिन पचारे व श.प्र. विशाल किन्हेकरांची मागणी
नागेश रायपुरे, मारेगाव : अवघा मारेगाव तालुका बैलांवर आलेल्या साथीच्या रोगाने ग्रासला आहे. त्यामुळे पशुंच्या खाजगी डॉक्टर्सकडून होणारी आर्थिक लुबाडणुकीने शेतकरीबांधव त्रस्त झाला. याची दखल युवासेनेचे माजी तालुका प्रमुख सचिन पचारे आणि शहर प्रमुख विशाल किन्हेकर यांनी घेतली. प्रशासनास्तरावर जनावरांचे विनामूल्य उपचार करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी व पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांनी दिले.
सध्या तालुक्यात बैलांच्या साथीच्या आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या आजारात प्रथम जनावरांच्या अंगावर सुजन येऊन नंतर शरीरावर गाठी निर्माण होतात. दरम्यान दोन ते तीन दिवसांत बैल दगावतो. या आजारामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावलीत. त्यातच तालुक्यात असलेले खाजगी पशूंचे डॉक्टर्सकडून जनावरांच्या उपचाराच्या नावावर शेतकरी बांधवांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. असा सूर शेतकरी बांधवांत आहे.
यामुळे जनावरांवर आलेल्या साथीच्या रोगाच्या निर्मूलनाकरिता तालुक्यातील प्रत्येक गावागावांत धुरळणी करावी. जनावरांवर प्रशासनस्तरावर विनामूल्य उपचार करावेत. या मागणीसाठी युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख सचिन पचारे व शहर प्रमुख विशाल किन्हेकर यांनी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यास निवेदन दिले आहे. यावेळी विजय मेश्राम, राजू मांदाडे, तुकाराम वासाडे, सोमेश्वर गेडेकर, गोपाल खामनकर, कवडू पाटील, प्रफुल सूर आदी उपस्थित होते.