माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तालुका कृषी कार्यालय व इतर सर्व कार्यालयात माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्या कडून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की माहिती अधिकार कायदा येऊन १५ वर्ष उलटली असून सुद्धा अजून पर्यंत तालुक्यात योग्य प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याशिवाय तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, तसेच सर्व प्रशासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये नियुक्त करण्यात आलेले जन माहिती अधिकारी आणि अपील अधिकारी यांच्या नावाचे फलक, संपर्क क्रमांक, विषयी माहिती कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना दिसून येणार अशा दर्शनी भागात लावण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यालयात येणाऱ्या अर्जावर तात्काळ दखल घेऊन तो अर्ज निकाली काढावा व तालुक्यातील जन माहिती अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन माहिती अधिकारातील माहितीचा विषय समजवून अर्जदाराला उडवा उडवी ची उत्तर न देता योग्य उत्तर देण्यात यावे. अर्जदाराला न घाबरवता त्याला कार्यालयात सन्मानाची वागणून ही देण्यात यावी. अशी मागणीही करण्यात आली आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ – जयंत उदकवार
निर्धारित वेळेत माहिती पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शासकीय कार्यालयांची आहे. मात्र, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पाळली जात नाही. नागरिकांना शासकीय कार्यालयाकडून सहजपणे माहिती दिली जात नाही. त्यामुळे माहिती अधिकार अर्जाची संख्या वाढण्यास प्रशासन जबाबदार आहे.
– जयंत उदकवार, माहिती अधिकार कार्यकर्ते
निवेदन देते वेळी माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत उदकवार, निखिल वनकर, आकाश आत्राम, कालिदास अर्के, नानाजी मडावी, भालचंद्र गुरुनुले, अजय कोवे इत्यादी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)