का लावावेत, कसे लावावेत आणि कधी लावावेत घरात आकाशकंदील?

आकाशकंदिलाचा संदर्भ रामायणात, मेसोपोटोमियात आणि बऱ्याच ठिकाणी

2

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आकाशकंदील बनवणं हा दिवाळीच्या सुट्यांतील धमाल प्रयोग. आपल्या भावंड आणि पालकांसह लेकरं हे कंदील तयार करायला लागतात. तो कधी जमतो, तर कधी जमतही नाही. तरीदेखील हा आकाशकंदील करण्याची मजा निराळीच आहे.

या आकाशकंदीलाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. या कंदीलाचे संदर्भ विविध संस्कृतींमध्ये, विविध देशांमध्ये येतात. दिवाळीत दिवा आणि आकाशकंदील यांचं काय महत्त्व आहे, हे नक्कीच पाहण्यासारखं आहे.

त्रेतायुगात रामासाठी आकाशकंदील लावले असं म्हणतात. आकाशकंदिलाची परंपराचा चिनची आहे, असंही म्हटलं जातं. आकाशकंदील सुरुवातीला बहुतेक ताऱ्यांच्याच आकाराचे असायचे. हा तारा आला कुठून, तर तो विविध संस्कृतींतून. मेसोपोटेमिया संस्कृतीच्या खोलात गेलं तर तिथेही प्रकाशमान ताऱ्यांचा संदर्भ येतो. दिवा, तारा आणि आकाशकंदील जगातल्या अनेक संस्कृतीमंध्ये आहेत.

येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी बेथलहेम येथे तारा दिसला असा बायबलमध्ये उल्लेख आहे. तो तारा नंतरच्या काळात ख्रिसमसला प्रतीक म्हणून लावणं सुरू झालं. आज दिवाळीला हिंदू परंपरेत घरोघरी आकाशकंदील लावतात. ख्रिसमसमध्येही लावले जातात.

चिनमध्येही भगवान बुद्धाच्या उत्सवात आकाशदिवे लावतात. जापानमध्येदेखील विविध प्रसंगी ते लावले जातात. या आकाशकंदिलाचा ‘बाप’ आहे साधा दिवा. त्याची सुरुवात झाली ती दिव्यापासूनच. हा दिवा आजच्या पिढीला जवळपास 72 हजार वर्षांनी सिनिअर आहे.

आदिमानवांना आगीची भीती आणि आकर्षण वाटायचं. त्यात त्याला आगीचं महत्त्व आणि उपयोग समजला. त्याला ऊब आणि प्रकाश दोन्ही मिळालेत. ही आग तेवती ठेवण्यासाठी त्याने विविध प्रयोग सुरू केलेत. प्राण्यांच्या चरबीचं तेल, वनस्पतींच्या धाग्यांच्या वाती आणि दगडाचे दिवे केलेत. ते पोर्टेबल झालेत. हा प्रकाश दिव्यामुळे इकडे तिकडे हलवता यायला लागला.

अश्विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत दिवाळी साजरी करणारे आकाशकंदील लावतात. आज विविध आकारांचे आकाशकंदील मार्केटमध्ये आलेत. जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेक आकाशकंदील हे ताऱ्याच्याच आकाराचे असत. तारा हा जवळपास प्रत्येक संस्कृतीत कोणत्या ना कोणत्या निमित्तानं येतोच.

मात्र मेसोपोटेमिया संस्कृतीत एनान्ना नावाची देवता मानतात. या देवतेचं चिन्ह तारा आहे. इस्लामसह अनेक धर्मांमध्येदेखील चांद आणि ताऱ्याला महत्त्व आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आकाशात तेजस्वी तारा दिसला होता. ‘मेसो’ म्हणजे मिश्र.

मेसोपोटेमिया ही असिरियन आणि बॉबिलोनियन अशी मिश्र संस्कृती आहे. ती टायग्रिस आणि युफ्रेटिस नदीच्या तीरांवर विकसित झाली. हा सध्या इराकचा भाग आहे. मेसोपोटेमिया कल्चरमध्ये एनान्ना नावाची देवता होती. या देवतेचं चिन्ह तारा होतं.

या एनान्न देवतचं रूपांतर पुढे बॉबीलोनियन संस्कृतीमध्ये इस्टर झालं. तिचंही चिन्ह ताराच होतं. नंतर इस्टर, अस्टार होत ते स्टार झालं. यावरूनच ‘अॅस्ट्रॉलॉजी’ हा ज्योतिष्याला समानार्थी शब्द इंग्रजीत आला, असं ज्योतिर्वीद डॉ. कुशल लोटे म्हणालेत.

ती शुक्राची चांदणी आहे. जगातल्या सर्व संस्कृतीत शुक्राची चांदणी हे मातृदेवतेचं प्रतीक आहे. जगातल्या सर्वच मातृपूजकांचा दिवस शुक्रवारच आहे.

त्रेतायुगात राम, सीता आणि लक्ष्मण वनवासातून परत येतात. तेव्हा आकाशकंदील लावल्याचं म्हटलं जातं. हा काळ महाकाव्यानुसार त्रेतायुग मानतात. रामाच्या राज्याभिषेकाला पहिला आकाशकंदील लावला अशी काही जणांची आस्था आहे. सुरुवातीला आकाशकंदील हा फक्त मातीचाच होता.

छिद्र असलेल्या मातीच्या भांड्यात तुपाचा दिवा ठेवला जात असे. हा मातीचा आकाशकंदील उंच बांधला जायचा. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच तत्त्वं. यालाच पंचमहाभूतदेखील म्हणतात. दिवाळीपर्यंत पावसाचं पाणी जमिनीत चांगलं मुरलेलं असतं. जमिनीतील पाणी म्हणजे आप तत्त्व.

जमिनीतल्या जलतत्त्वातून काही निगेटिव्ह एनर्जी बाहेर येते. त्याला घरात लावलेला आकाशकंदिलातील अग्नितत्त्व बॅलेंस करतं, अशी एक श्रद्धा आहे.

आकाशदिव्याला अनेक नावं आहेत. याला आकाशदीप म्हणतात. कानडीत गुडुदीप आणि नक्षत्रदीप म्हणतात. दिवाळी हा यक्षांचा उत्सव असल्याचं मानतात. त्यामुळे हेमचंद्र दिवाळीला ‘यक्षरात्री’ म्हणतो. वात्स्यायनाच्या कामसूत्रातही यक्षरात्रीचा उल्लेख येतो.

नीलमत या पुराणग्रंथात याला दिवाली म्हणतात. ज्योतिष्य रत्नमाला ग्रंथांनं मराठीत रूढ झालेला ‘दिवाळी’ हा शब्द दिला. भविष्योत्तर पुराणात ही ‘दीपालिका’ आहे. कालविवेक ग्रंथात याला सुखरात्री म्हणतात. यालाच जवळचा शब्द ‘सुखसुप्तिका’ व्रतप्रकाशग्रंथात वापरला आहे.

आकाशकंदिलाची परंपरा चायनाची आहे. प्रा. डॉ. अशोक राणा यांच्यानुसार आकाशकंदील हे ख्रिस्तपूर्व काळातही वापरले जात. येशू ख्रिस्ताच्यानंतर जवळपास 100 वर्षानंतर ताऱ्याच्या आकाशकंदिलाची परंपरा सुरू झाली. बायबलमध्येही सालोमनचा तारा अथवा डेव्हीडचा तारा असा उल्लेख येतो.

इज्राईलमध्ये ताऱ्याची परंपरा आजही आहे. फटाके, बारूद यांचा शोध चीनचा आहे. आकाशकंदिलाची परंपरा ही चीनमधून आली असावी. सतराव्या शतकात इंग्रज भारतात आलेत. कदाचित त्यांनीदेखील हे आकाशकंदील भारतात आणले असावेत.

यंदा दिवाळी कोरोनाच्या सावटात आली. तरीदेखील लोकांचा उत्साह कमी झाला नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील आलेत. पर्यावरणपूरक कापडी आकाशकंदिलांना याही वर्षी चांगलीच डिमांड आहे. कागद, प्लास्टिकस विविध मटेरियल्सचे आकाशदिवे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. दारावर लावता येईल असं आठ-दहा आकाशकंदिलांचं तोरणही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांचं माणसाला आकर्षण आहेच. अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून तर आतापर्यंत. त्यातही तेज हा घटक अत्यंत महत्त्वाचा. अभ्यासक प्रा. अजय वानखडे ख्रिश्चनिटीया संदर्भ देतात, त्यानुसार येशू म्हणतो, “मी जगाचा प्रकाश आहे, जो त्याला अनुसरतो, तो अंधारात चालणार नाही”.

तसाही पूर्वी ताऱ्यांचा उपयोग दिशा ठरवण्यासाठी व्हायचा. तारा मार्गदर्शकच आहे. वेदांमध्ये ‘तमसो मा ज्योतिर्गमयम्’ म्हणजेच मला अंधारातून प्रकाशाकडे ने, अशी प्रार्थना आहे. बुद्ध परंपरेत ‘अत्त दीप भव’ म्हणजे मला दीपाप्रमाणे प्रकाशित कर ही प्रार्थना आहे.

तेव्हा या दीपपर्वावर मनातला अंधार दूर व्हावा. राग, द्वेष, चिंता काळजीचा अंधार दूर व्हावा. कोरोनाच्या महामारीचा काळदेखील जगभरात अंधाराचाच आहे. दिवाळी हा प्रकाशाचा आणि आशा निर्माण करणारा उत्सव. चला प्रकाशाकडे वाटचाल करूयात.

आज निघालेत 12 पॉजिटिव्ह

 

 गोदरेजच्या विविध उत्पादनांवर सूट आणि बक्षिसांची लयलूट 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

2 Comments
  1. […] का लावावेत, कसे लावावेत आणि कधी लावावे… […]

  2. […] आकाशकंदिलाचा संदर्भ रामायणात, मेसोपो… […]

Leave A Reply

Your email address will not be published.