बोपापूर ग्रामपंचायत बनली विविध समस्यांचे माहेरघर
ग्रामवासीयांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील बोपापूर गाव ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. ग्रामपंचायती अंतर्गत 14 व्या वित्त आयोगांतर्गत गावातील सांडपाणी जाण्याकरिता नाली बांधकामे करण्यास सुरुवात झाली.
परंतु अर्धवट नाली बांधकाम करून इतर काम बंद अवस्थेत पडले आहे. तर अर्धवट बांधकाम नाली सांडपाणी व कचऱ्याने तुडुंब भरून आहे. अशा विविध समस्यांची तक्रार ग्रामवासीयांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.
कुणीही नाल्यांच्या सफाईकडे लक्ष देत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. तर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खनिज विकास निधी अंतर्गत आरओ प्लान्ट बसविण्यात आले आहे. तेसुद्धा बंद आहेत. ग्रामवासींयाकरिता नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.
परंतु पाण्याच्या टाकीमध्ये उंदीर पडून मेला. तो पाईपमध्ये फसल्याने पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे ग्रामवासीयांत प्रचंड संताप उफाळला आहे. पाण्याच्या टाकीत उंदीर पडून मरण्याची घटना दोनदा झाली आहे.
पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकण्याकरिता सचिव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळसुद्धा नाही काय? असा संतप्त प्रश्न ग्रामवासी करीत आहेत. पाणी आणि इतर समस्यांबाबत सचिव व कर्मचारी यांना ग्रामवासीयांनी तक्रार केली असता दोघांकडून समाधान झाले नाही.
पाण्याच्या टाकीत उंदीर मरूनही टाकी साफ करण्यात आली नाही. ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. तसेच आरओ प्लान्ट बंद असल्यामुळे गावकऱ्यांनी पाणी कुठून प्यावे, असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.
तसेच सांडपाण्याचे नियोजन नसल्यामुळे दुर्गंधी व डासांचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे गावात विविध रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आरोप्लान्ट ,गावातील पाणीपुरवठा व अर्धवट असलेले नालीचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी अमोल आवारी ,उदय ढवस व सुरेश बावणे यांनी गटविकास अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा