दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त
वणी पोलीसांच्या कारवाईने रेतीमाफियांचे धाबे दणाणले
जब्बार चिनी, वणी: मागील अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेतीमाफियांची दोन वाहने पोलिसांनी बुधवारी दुपारी पकडली. वणी ब्राह्मणी मार्गावर एका जिनिंगजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी ट्रकमधून खाली करण्यात आलेली रेती आणि 2 हायवा ट्रक जप्त करण्यात आले. वणी पोलिसांच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणलेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून वणी तालुक्यात हा गोरखधंदा सुरू आहे. एक महिन्यांपूर्वी शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांनी रेतीची अवैध वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त करून रेतीमाफियांना दणका दिला होता. त्यामुळे काही दिवस रेतीतस्कर शांत बसले. नंतर मात्र पुन्हा जैसे थे सुरू झाले.
वणी पोलिसांचे डीबी पथक बुधवारी 5 वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावर पेट्रोलिंगवर असताना त्यांना रेती भरलेले दोन ट्रक दिसून आले. पथकाने ट्रकचा पाठलाग करून वणी ब्राह्मणी रस्त्यावर एका जिनिंगजवळ दोन्ही ट्रक पकडले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी महसूल अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
महसूल अधिकाऱ्यांनी ट्रकमधून खाली करण्यात आलेली 10 ब्रास रेती पंचनामा करून जप्त केली. तसेच रेतीची वाहतूक करणारे हायवा क्र. (एम.एच. 34 बी.जी. 7362) व (एम.एच. 34 ए.बी. 2083) ताब्यात घेऊन तहसील कार्यालय समोर उभे करण्यात आले.
रेतीचे अवैध ट्रक पडून 24 तास उलटले असता महसूल अधिकाऱ्याची दंड लावण्याबाबत कारवाई सुरूच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महसुलच्या कार्यवाहीवर शंका उपस्थित केली जात आहे. कारवाई करण्यास विलंब का केले जात आहे ? हाही प्रश्न येथे उपस्थित झाला होता.
कॅल्क्युलेशन चुकल्याने झाला उशीर
दोन्ही हायवावर निश्चितच कारवाई होणार आहे. कॅलकुलेशन चुकल्याने थोडा उशीर झाला आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आर्डर निघेल.
शाम धनमने, तहसीलदार वणी
रेतीतस्करांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचे हायकोर्टाचे आदेश?
रेतीतस्करीच्या शक्य त्या प्रकरणामध्ये रेतीमाफियांविरुद्द ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999) व एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहे. परंतु वणी विभागात आजपर्यंत एकाही रेतीमाफियावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही.
रॉयल्टी छत्तीसगडची मात्र रेती महाराष्ट्राची
मागील एका वर्षांपासून राज्यात एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. उलट राज्याच्या सीमेला लागून मध्यप्रदेश, छत्तीसगढ व तेलंगणा राज्यातून दररोज परवाना असलेली शेकडो हायवा रेती राज्यात येत आहे. चंद्रपूर व घुग्गुस येथील रेतीमाफिया छत्तीसगड किंवा मध्यप्रदेश येथील एखाद्या रेती व्यावसायिकाकडून त्या राज्यातील रॉयल्टी बूक 500 ते 1000 रु. प्रति ब्रासप्रमाणे विकत घेत असते. त्या रॉयल्टीवर वर्धा व पैनगंगा नदीतून चोरलेल्या रेतीचा पुरवठा यवतमाळ, वर्धा, अमरावती ते अकोल्यापर्यंत केला जातो.
महसूल विभागासोबत रेती तस्करांचे साटेलोटे असल्यामुळे रेतीचे वाहन कुठेही अडविले जात नाही.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा