नागेश रायपुरे, मारेगाव: घरातील पैसे चोरून पती कॉईनबॉक्स खेळण्यास गेला. तिथे तो सर्व पैसे हरला. पत्नी पैसे मागण्यासाठी कॉईनबॉक्सच्या संचालकाकडे गेली असता कॉईनबॉक्स संचालकाने पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव येथे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी कॉईनबॉक्स संचालकावर गुन्हा दाखल केला आहे
तक्रारीनुसार पीडित महिला (45) ही मारेगाव येथील रहिवाशी असून ती तिच्या पती व मुलीसह राहते. पती हा मजुरीचे काम करतो. त्याला अध्येमध्ये कॉईनबॉक्स (कॅसिनो) वर पैसे खेळण्याची सवय आहे. शनिवारी दिनांक 9 जानेवारी रोजी पतीने घरातील स्टिलच्या डब्यात ठेवलेले 9 हजार रुपये कॉईनबॉक्सवर खेळण्यासाठी चोरले व तो पत्नीला भाजीपाला आणण्यासाठी जातो असे सांगून घरून निघून गेला. मात्र पती बराच वेळ आला नाही. त्यामुळे पत्नी भाजीपाला आणण्यासाठी निघाली. भाजीसाठी पैसे घेण्यासाठी तिने डब्यात पाहिले असता तिला डब्यातील 9 हजार रुपये गायब असल्याचे आढळून आले.
पतीला कॉईनबॉक्सवर पैसे लावण्याची सवय असल्याने ती तिची ननंद व मुलीला सोबत घेऊन पतीला शोधण्यासाठी कॉईनबॉक्स (कॅसिनो) सेंटरवर गेले. तिथे तिला पती आढळून आला. पतीला 9 हजारांबाबत विचारले असता त्याने डब्यातून पैसे घेतले व सर्व पैसे कॉईनबॉक्सवर खेळून हरल्याचे कबुल केले. पत्नी हरलेले पैसे परत मागण्यासाठी कॉईनबॉक्सचा संचालक राहुल जैसवाल (35) याच्याकडे गेली.
पत्नीने संचालकाकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता राहुल जैसवाल याने पती खेळण्यात सर्व पैसे हरला असल्याने रक्कम परत करण्यास नकार दिला व बाजुला अंधारात चल तिथे प्रकरण निपटवू असे म्हणाला. आरोपीने पीडितेला बाजुला नेले. तिथे पीडितेच्या गालावर मारले तसेच हात पकडून, साडी ओढून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केली असता तिथे तिची ननंद व मुलगी आली.
या घटनेनंतर पीडितेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी राहुल जैसवाल (35) रा. मारेगाव याच्याविरोधात भादंविच्या कलम 354, 354 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा