नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना पॅकेज द्या: आ. बोदकुरवार
महाविकास आघाडी सरकारचा विदर्भावर अन्याय, आमदारांची टीका
जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2021-22 साठी मांडलेला अर्थसंकल्प हा गोर- गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प आहे. यात विदर्भाच्या वाट्याला काहीच आलेले नाही. या सरकारने विदर्भाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अशी टीका वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार केली आहे.
गेल्या 60 वर्षांपासून सातत्याने विदर्भावर जाणीव पूर्वक अन्याय होत आहे. एक वर्षापूर्वी असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु या महाविकास आघाडी सरकारने विदर्भाबाबत अन्यायकारक धोरणे स्वीकारले आहे. अशा धोरणामुळे विदर्भाचा अनुशेष भरून निघणे तर दूरच परंतु यापुढे हा अनुशेष अधिक वाढणार आहे. अशी ही टीका त्यांनी केली.
या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी विशेत आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांची रक्कम देण्याचे या सरकारने जाहीर केले होते. परंतु या अर्थसंकल्पात याचा कुठेही समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे प्रामाणिक पणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर या महाआघाडी सरकारने अन्याय केला आहे.
सर्व सामान्य नागरिकांवर वीज दरवाढीमुळे जो भुर्दंड पडत होता. तो भुर्दंड माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु या अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. या सर्व बाबींचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार बोदकुरवार यांनी केली आहे.
हे देखील वाचा: