आज आले नाही घरोघरी पेपर, वृत्तपत्र विक्रेत्यांचा वितरणावर बहिष्कार
कोरोना चाचणी सक्तीची केल्याने वितरक नाराज
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना चाचणी सक्तीची केल्याने वणी येथील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी रविवार 14 मार्च रोजी वृत्तपत्र वितरणावर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला. त्यामुळे आज शहरात कोणत्याही वृत्तपत्रांचे वितरण करण्यात आले नाही. प्रशासनाने 21 मार्चपर्यंत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. तर कोरोनाच्या चाचणीच्या भीतीने मुलं कामावर येण्यास धजावत असल्याची प्रतिक्रिया वितरकांनी दिली आहे. दरम्यान आज चाचणीसाठी सक्ती करू नये यासाठी वृत्तपत्र वितरकांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.
शहरातील सर्व पानपट्टी, भाजीपाला विक्रेते, हॉटेल व इतर व्यावसायिकांप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वतः व आपल्या आस्थापनेवरील कामगारांची 11 ते 21 मार्च पर्यंत कोरोना चाचणी करून घेण्याचे नोटीस जिल्हा प्रशासनाने बजावली आहे. अन्यथा 22 मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे. असा इशाराही दिला आहे. त्याच अनुषंगाने वणी नगर परिषद प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना स्वतः व कामगारांची मोफत कोरोना टेस्ट करुन घेण्याचे नोटीस बजावली आहे.
येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी आज पेपर वितरण बंद करुन याबाबत सर्व वृत्तपत्र प्रकाशकांना पत्र देऊन कळविले आहे. तसेच उप विभागीय अधिकारी वणी यांना निवेदन दिले. यावेळी सलीम फारुकी, शंकर पाहुनकर, विनोद कुरेकर, संजय कुरेकर, शुभम ठाकरे, अनिल ठाकरे, फय्याज शरीफ, चंदू पाहुनकर, राजू धावंजेवार, दिगाम्बर चांदेकर, रामकृष्ण वैदय, महादेव दोडके, ज्ञानेश्वर बोनगिरवार, श्रीकांत किटकुले, रमेश तांबे व इतर वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
चाचणी मोफत आहे त्यामुळे करण्यास हरकत नसावी: माकोडे
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अनुषंगाने कोरोना संक्रमणची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने सर्व किरकोळ विक्रेत्यांना मोफत कोरोना चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. वृत्तपत्र वाटप करणाऱ्या एकादा मुलाला कोरोना संक्रमण असल्यास अनेक जण संक्रमित होण्याची भीती आहे. नोटीस देणे म्हणजे लगेच कारवाई करणार असे नाही. इतर व्यवसायिकांप्रमाणे वृत्तपत्र वितरण करणाऱ्या मुलांनाही येत्या 4-5 दिवसात कोरोना चाचणी करून घ्यावी.
– संदीप माकोडे: मुख्याधिकारी न.प.वणी===============================
चाचणीच्या भीतीने मुलांची कामास टाळाटाळ: सलीम फारुखी शेख
वणी येथील वृत्तपत्र विक्रेत्याकडे तब्बल 35 मुलं शहरात घरोघरी अखबार वाटपचे कार्य करतात. वृत्तपत्र वाटप करणारे मुलं फक्त एका तासासाठी काम करून घरी निघून जातात. त्यानंतर ते कुणाच्या संपर्कात येते याची जाणीव आम्हाला नसते. वृत्तपत्र विक्री व्यवसाय निम्या कमिशनवर केल्या जाते. मुलांनाही दर रोज मजुरी दिली जाते. कोरोना चाचणीच्या भीतीने अनेक मुलांनी कामावर येण्याचे टाळले आहे. शासनाने आमची समस्या लक्षात घेऊन कोरोना चाचणी बंधनकारक करू नये.
– सलीम फारुकी शेख: वृत्तपत्र विक्रेता वणी
हे देखील वाचा: