नखांसाठी वाघिणीची निर्घृण शिकार, मांगुर्ला जंगलातील घटना

नाल्याजवळील गुहेत आढळला मृतदेह, वाघीण गर्भवती असल्याची शक्यता

0

सुशील ओझा, झरी: नखांसाठी एका वाघिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळील जंगलात घडली आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत वाघीणच्या शऱीरावर हत्याराने मारल्याचे घाव असून ती असलेल्या गुहेच्या तोंडाशेजारी आग लावल्याचे आढळून आले आहे. तसेच वाघिणीचे नखे तोडून नेल्याचे आढळून आले आहे. त्यावरून शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाली असल्याचे निष्पन्न होत आहे. ही वाघीण गर्भवती असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पांढरकवडा वनविभागाच्या मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघ मृत अवस्थेत असल्याची माहिती रविवारी सकाळी वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागाची टीम तसेच डॉक्टर व व्याघ्र संवर्धनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जळालेल्या लाकडांवरून आढळून आले. तसेच वाघिणीच्या गळ्यात फास आढळला व तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले. शिकारींनी अत्यंत निघृणपणे ही हत्या केली आहे.  

याशिवाय वाघिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतोय. घटनास्थळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, डॉ. अरुण जाधव-वणी, डॉ. एस एस चव्हाण- झरी, डॉ. डी जी जाधव- मुकुटबन, डॉ. व्ही सी जागडे- मारेगाव यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. सदर वाघीण ही गर्भवती असल्याने तिने गुहेत आसरा घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे. मृत्यूचे कारण आणि मृतक वाघीण ही गर्भवती होती की नाही हे शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला आसून प्रकरणाचा तपास वनसंरक्षण पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात मुकुटबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय याबाबत विविध तर्कवितर्कही लावले जात आहे. 

हे देखील वाचा:

सावळागोंधळ: 14 दिवसांपासून संशयीतांचे रिपोर्टच नाही

लालपुलिया परिसरात आढळला वृद्धाचा मृतदेह

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

Leave A Reply

Your email address will not be published.