जितेंद्र कोठारी, वणी: पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या पाटणबोरी येथील एका खासगी गोडाऊनमध्ये अवैधरित्या साठवणूक केलेला खतसाठा जप्त करण्यात आला. विशेष पोलीस पथकाने रविवार 13 जून रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान ही कार्यवाही केली. गोडाऊनमध्ये तब्बल 15 लाख रुपये किमतीचे खत अनधिकृतपणे साठवून ठेवल्याचे आढळले आहे. पांढरकवडा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गोडावून सील केले आहे.
पाटणबोरी ते पिंपळखुटी मार्गावर आनंद चोपडा यांचे गोडावून आहे. या गोडाऊनमध्ये अनधिकृतरित्या खताचा साठा करून ठेवल्याची माहिती विशेष पोलीस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांना मिळाली होती. माहितीवरून पथकाने सोमवारी या गोडावूनवर छापा टाकला. गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात खताचे पोते ठेवून आढळले.
पथकाने याबाबत तालुका कृषी विभाग केळापुर याना माहिती दिली. सूचनेवरून तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार व कृषी विस्तार अधिकारी पं. स.पांढरकवडा चव्हाण यांनी गोडाऊनची तपासणी केली असता अनधिकृत आणि अवैधरीत्या खताचा साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी गोडाऊन सील करुन संशयित इसमाविरुद्द पुढील कारवाईसाठी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याची माहिती आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक वणी व पांढरकवडा उपविभागी प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, पोलीस हवालदार राजू बागेश्वर, पो. ना. जितेश पानघाटे, अजय वाभीटकर, पोका निलेश भुरे, शिपाई मुकेश करपते, मिथुन राऊत व पोलीस वाहन चालक अजय महाजन तसेच कृषी अधिकारी राकेश दासरवार व चव्हाण यांनी पार पाडली.
कृषी अधिकाऱ्यांकडून “नो रिप्लाय”
अवैधरित्या साठवणूक केलेल्या खत साठयाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वणी बहुगुणी प्रतिनिधीने कृषी अधिकाऱ्यांना वारंवार फोन कॉल व मेसेज केले. मात्र तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार व विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण यांनी एकही फोन उचलला नाही.
हे देखील वाचा: