विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिंदोला लगतच्या शालिवाहन वीज प्रकल्पा शेजारी शिंदोला येथील मधुकर कुचनकर यांचे शेत आहे. सदर शेतात सोमा मडावी हा शेतगडी कुटुंबासमवेत राहतो. रात्री ९ वाजता सोमा आपल्या झोपडीच्या अंगणात बसून असताना त्याला पट्टेदार वाघ शेतात दिसला. परिणामी घाबरलेल्या सोमानी कुटुंबासह रात्र दहशतीत काढली. सकाळी शेतमालकाचा मुलगा अमोल कुचनकर, शेतमेरकरी ओमप्रकाश थेरे, सोमा मडावी आदींनी वाघ गेल्याच्या दिशेला शोध घेतला. तेंव्हा वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले.
सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. हरबरा, गहू आदी रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी बांधव शेतात रात्रीला जागलीला जातात. यापूर्वी कुर्ली,कोलगाव, चिखली गावशिवारात वाघाच्या पावलांची ठसे आढळून आले होते. कोळसा खाण परिसरात वाघाने रोह्याच्या पिलाची शिकार केली होती.
वाघ किंवा वाघाच्या पावलांचे ठसे दिसल्याची माहिती वनविभागाला ग्रामस्थांकडून कळताच वनाधिकारी, वनपाल कर्मचारी तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन घटनेची शहानिशा करीत आहे. शिंदोला परिसरात वाघ असल्याच्या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. शेतकरी, शेतमजुरांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.