अहेरअल्ली जि.प. शाळेचे शौचालय पाडल्याने विद्यार्थ्यांचे हाल
मुख्याध्यापकांची ग्रामपंचायतीकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अहेरअल्ली जिल्हा परिषद शाळेतील शौचालय व स्वच्छता गृह पाडल्याने विद्यार्थाचे हाल होत आहे याबाबत मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. जिल्हा परिषद शाळेची सुरक्षाभींत बांधण्याचा ठेका एका राजकीय पक्षाशी निगडीत ठेकेदाराला मिळाल्याची माहिती असून ठेकेदाराने भिंतीचे बांधकाम करीत असताना शाळेतील शौचालय व स्वच्छतागृह पाडले. दरम्यान त्यांनी सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण होताच नवीन शौचालय व स्वच्छतागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप हे काम पूर्ण पूर्ण झाले नाही. दरम्यान सरपंच यांनी सदर काम हे ग्रामपंचायतीचे असून ग्रामपंचायत पूर्ण करणार असल्याची माहिती दिली.
वर्ग 5 ते 7 च्या शाळा सुरू झाली आहे. परंतु शाळेतील मूल व मुलींना स्वच्छतागृह नसल्याने नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे शौचालय व स्वच्छतागृहाचे बांधकाम त्वरित करावे अशी मागणी मुख्याध्यापक यांनी केली आहे. विशेष म्हणजे सदर ठेकेदार हा ग्रामपंचायत सचिवावर बिल काढून देण्याकरिता दबाव टाकत असल्याची माहिती आहे तर काही अधिकारी सरपंच व सचिव यांना सुद्धा फोन करून बिल काढण्याकरिता बोलत असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर काम ग्रामपंचायतीचे, त्यामुळे ग्रामपंचायत पूर्ण करणार: सरपंच
जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीचे काम ग्रामपंचायतद्वारे करण्यात आले आहे. बांधकामाच्या वर्क ऑर्डरवर कोणत्याही ठेकेदारांच्या नावाचा उल्लेख नाही. तसेच ग्रामपंचायत शाळेतील पाडलेले शौचालय व स्वच्छतागृह बांधून देण्याचे काम ग्रामपंचायतचे असून ते बांधून देणार व जमा असलेला पैसा कुणालाही देणार नाही तो निधी गावविकासकरिता वापरला जाणार. तसेच ग्रामपंचायतीच्या कामात कुणीही अडथळा आणण्याची गरज नाही, विनाकारण कामात हस्तक्षेप केल्यास खपवून घेतला जाणार नाही.
– हितेश उर्फ छोटू राऊत, सरपंच अहेरअल्ली
हे देखील वाचा:
मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी