भास्कर राऊत, मारेगाव: चिंचमंडळ गावाजवळील गोठ्यामध्ये बाहेर बांधून असलेल्या बैलावर वीज कोसळून बैल ठार झाला. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेने शेतकऱ्यांवर ऐन शेतीच्या हंगामातच मोठे संकट कोसळलेले आहे. काल रविवारी वरूड येथे वीज कोसळून 6 बक-या ठार झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एका जनावराचा मृत्यू झाला आहे.
सध्या पावसाचा हंगाम सुरू आहेत. कधी खूप पाऊस तर कधी खूप उन्ह असे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच चिंचमंडळ परिसरात आज दि. 30 ऑगस्टला दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गावातील बाळकृष्ण पालकर यांचा गोठा गावालाच लागून आहे.
दुपारच्या सुमारास उन्ह जास्त नसल्याने पालकर यांनी त्यांचा एक धवऱ्या रंगाचा व एक धामन्या रंगाचा बैल गोठ्यामध्ये बाहेर बांधला होता. त्यांना चारा टाकून ते शेतामध्ये कामासाठी गेले. अशातच दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. यातच वीज चमकली आणि ती गोठ्यामध्ये असलेल्या बैलाच्या अंगावर पडली.
यात धामन्या रंगाचा बैल जागीच मृत्युमुखी पडला. मात्र बाजूलाच असलेला धवऱ्या रंगाच्या बैलाला मात्र कोणतीही इजा झालेली नाही. ऐन शेतीच्या हंगामातच बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे. मारेगाव तालुक्यात विजेचे तांडव सुरूच आहे. काल वरूड येथे वीज कोसळून 6 बक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज ही घडली. पशुपालकांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.