लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू

दुपारी परिसरात विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस

बहुगुणी डेस्क, झरी: लिंगटी येथे आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह धुवाधार पाऊस झाला. या पावसात शेतात वीज कोसळून लिंगटी येथील वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. शेख जब्बार शेख मेताब (अंदाजे 65) असे वडिलांचे नाव आहे. तर शेख रहीम शेख जब्बार (अंदाजे 35) असे मुलाचे नाव आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी वणी येथे हलवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की लिंगटी येथे गावालगत असलेल्या ओढ्याच्या शेजारी शेख जब्बार यांची शेती आहे. त्यांनी सदर शेत मक्त्याने घेतले आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेख जब्बार यांनी सोयाबिनचे नुकसान होऊ नये म्हणून आजपासूनच सोयाबिन काढण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळी त्यांनी यासाठी शेतात ट्रॅक्टर व थ्रेशर मशिन लावली होती. दुपारी शेतात ट्रॅक्टरने सोयाबिन कापून ते थ्रेशर मशिनमध्ये काढणे सुरू होते.

आज शुक्रवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास परिसरात वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सावधगिरी म्हणून शेतातील मजूर आणि थ्रेशर चालक शेतातून निघून गेले. मात्र शेतात सोयाबिन काढलेली गंजी होती. सोयाबिनचे नुकसान होऊ नये बापलेकांनी ती गंजी झाकण्याचा प्रयत्न केला.

एका बाजूने वडिलांनी ताडपत्री धरली तर दुस-या बाजून मुलाने ताडपत्री धरली होती. त्याच वेळी त्या ठिकाणी वडिलांच्या अंगावर अचानक वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळच असलेला मुलगा हा देखील विजेमुळे प्रभावित झाला. यात तो जखमी झाला.

शेतातील मजुरांनी तातडीने दोघांनाही झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र डॉक्टरांनी वडिल शेख जब्बार यांना मृत घोषीत केले तर मुलगा रहिम याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगिता हेलांडे या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मृतकाच्या मागे पत्नी व दोन मुले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

नवजात बाळाची विक्री करण्याचा डाव उधळला

महाविकास आघाडी सरकार अमरपट्टा घेऊन आली नाही- देवेंद्र फडणवीस

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.