दुकानदारांच्या धाकाने बदलला घरकुल लाभार्थ्यांचा रस्ता

थकीत रक्कम त्वरीत मिळावी यासाठी लाभार्थ्यांची मुख्याधिका-यांना विनवणी

भास्कर राऊत, मारेगाव: पंतप्रधान घरकुल योजनेच्या थकीत असलेल्या रकमेचे उर्वरित हप्ते त्वरित देण्यात यावे, अशी विनवणी मारेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लोकांनी उधारीवर साहित्य घेऊन घरकुलाचे काम केले मात्र उधारी थकल्याने लाभार्थ्यांवर रस्ता बदलवण्याची वेळ आली आहे. 

तीन वर्षांपूर्वी मारेगाव येथील काही लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते. लाभार्थ्यांनी घरकुलांचे कामाला सुरुवात केल्यानंतर आणि काही काम झाल्यानंतर टप्याटप्याने घरकुलांची रक्कम लाभार्थ्यांना दिली जात असते. सुरुवातीला काही रक्कम लाभार्थ्यांना मिळाली. त्यानंतर लाभार्थ्यांनी मोठया जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली.

काही लाभार्थ्यांनी उसनवारी करून, काहींनी दुकानदारांकडून उधारवाडी करून आपल्या घरकुलाच्या कामाला पूर्णरुप दिले. तर ज्यांची पैशाची व्यवस्था झाली नाही ते अजूनही किरायाच्या घरात राहून शासनाचे पैसे येण्याची वाट पाहत काम पूर्ण करण्याची वाट पाहात आहेत.

ज्यांच्याकडे दुकानदारांची उधारी आहेत त्यांच्याकडे दुकानदार उधारीसाठी चकरा मारत आहेत. पैसेच द्यायला नसल्याने लाभार्थी दुकानदार दिसल्यावर लपून राहत असतात. तर काही लाभार्थ्यांनी जाण्या येण्याचा रस्ताच बदलवलेला आहे. काहींनी उसनवारी करून तर काहींनी सावकाराकडून पैसे काढून काम केले. त्यामुळे सावकार सुद्धा त्यांचेकडे चकरा मारत आहेत. अनेकांना साधे बाजारात फिरणेही कठीण झाले आहे.

लाभार्थ्यांची होत असलेली परवड थांबवून थकलेली घरकुलची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी विनवणी सुद्धा लाभार्थ्यांनी केलेली आहे. मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून आम्हाला 15 दिवसामध्ये सहकार्य करावे अन्यथा आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी चिंतामण बोरेवार, तानेबाई बोनू आत्राम, सचिन गेडाम आदिल जुमनाके, विठ्ठल काळे, किशोर चिंचोलकर यांच्यासह काही लाभार्थी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

करणवाडी-खडकी पांदण रस्त्याची दुरवस्था

शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात

Comments are closed.