मारेगाव नगरपंचायत निवडणूक: सर्वच उमेदवारांचा विजयाचा दावा
निवडणुकीमुळे शहरात माहोल्ल, आज थंडावणार प्रचार तोफा
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सध्या सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. छोट्या पक्षांनी तसेच आघाड्यांच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढवली असून विजय नेमका कोणाचा हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना मुक प्रचारातून खरे कसब दाखवावे लागणार आहे.
सध्या मारेगाव शहरात नगरपंचायत निवडणुकीचा ज्वर चढलेला आहे. शहरात दिवसभर प्रचाराच्या भोंग्याने धुमाकूळ घातलेला असून दिवसा प्रचार तर रात्री जेवणावळी यांनी सगळे वातावरण भरलेले आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला उमेदवार तयार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आघाडी-संभाजी ब्रिगेड इ. पक्षांसह अपक्ष असे अनेक उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत असले तरी लहान पक्षाच्या उमेदवारांनी जास्तच डोकेदुखी वाढवलेली आहे.
सध्या सर्वच उमेदवार व्यक्तिगत पातळीवर भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत. कोण निवडून येईल आणि कोण कोणाला पाडेल याचा सध्यातरी नेम नसला तरी मी निवडून येतोच असे सर्वच उमेदवार छातीठोकपणे सांगत आहेत. शहरातील काही प्रभागामध्ये दुहेरी तर अनेक प्रभागामध्ये तिहेरी आणि बहुरंगी लढतीचे चित्र आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचाराचा जोर लावून आहेत. काही राजकीय पक्षाचे उमेदवार हे खर्चामध्ये कमी पडतांना दिसून येत आहे.
अनेक मतदार हे या निवडणुकीच्या माध्यमातून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मतदार तर सकाळी एका प्रचार रॅलीत, दुपारी दुसऱ्या पक्षाचा दुपट्टा खांद्यावर घेऊन फिरतात. तर रात्रीच्या वेळी तिसऱ्या उमेदवाराच्या जेवणावळीत दिसतो. आज सर्वच पक्ष प्रभागातील घर अन घर पिंजून काढत असून आपण कसे विजयी होऊ यादृष्टीने प्रयत्नरत असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.