जितेंद्र कोठारी, वणी: रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकच्या मागील भागात दुचाकी आदळून युवक गंभीररीत्या जखमी झाला. वणी यवतमाळ राज्यमार्गावर राजूर फाट्याजवळ मंगळवारी रात्री 9 वाजता दरम्यान हा अपघात झाला. होमेश मारोती टोंगे (36) रा. सोमनाळा, ता. मारेगाव असे अपघातात जखमी युवकाचे नाव आहे. त्याला उपचारासासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र रात्रीच त्याचा मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार होमेश लालपुलिया परिसरातील एका कोल डेपो मध्ये कामावर होता. ड्युटी संपल्यावर तो नेहमीप्रमाणे दुचाकीने गावाकडे जात होता. दरम्यान राजूर रिंगरोड जवळ समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे त्याला रस्त्याच्या बाजूने उभा असलेला ट्रक दिसला नाही. त्यामुळे होमेशची दुचाकी उभ्या ट्रकवर मागून जोरदार धडकली.
दुर्घटनेत होमेश गंभीर जखमी झाला होता. घटनास्थवर जमा झालेल्या नागरिकांनी जखमी युवकाला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राजूर फाटा की यमलोकाचे दार ?
वणी यवतमाळ राज्यमार्गावर राजूर फाटा हा अपघातप्रवण स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेक लोकांना आपले जीव गमवावा लागले आहे. राजूर गावाकडून येणाऱ्या वाहनचालकांना राज्यमार्गावर येणारे वाहन दिसून पडत नाही. त्यामुळे बहुतांश अपघात येथे घडत आहे. या ठिकाणी अपघातात वाढ झाल्यामुळे आता राजूर फाट्याला यमलोकचा दार असल्याचे बोलले जात आहे.
दुचाकीस्वारांना हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा:
गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर
Comments are closed.