ई-पॉस मशीन बंद पडल्याने धान्य वाटपात अडचणी

सकाळ पासून वाटप बंद, आठवडाभरात समस्या दूर होणे कठीण

जब्बार चीनी, वणी: कोरोना काळात गरीब नागरिक अन्न धान्यापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने निःशुल्क धान्य वाटपाची घोषणा केली. या योजनेचे वणीत मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. मात्र गेल्या 8 दिवसांपासून ई-पॉस मशीन तांत्रिक अडचणी येत असल्याने मशिन वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे धान्य वाटपात अनेक अडचणी येत असून गोरगरिबांना वेळेत धान्य मिळणे कठीण जात आहे. परिणामी अनेकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. या अडचणीमुळे रेशन दुकानदारही त्रस्त झाले आहे.

ई-पॉस मशिनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीचा वापर करून धान्य वाटप केले जाते. ई – पॉश मशिन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकला जातो. ग्राहकाचा अंगठा घेतल्यानंतर मशिनमध्ये संबंधित कार्डधारकाचा धान्याचा क्वोटा येतो. या प्रक्रियेनंतर मशिन लगेच बिल दाखविते. परंतु सध्या ई-पॉस मशिन बिल दाखवत नाही आहे. यावर दुकानदारांचे म्हणणे आहे की मशिन अंगठाच घेत नाही त्यामुळे समोरची प्रक्रीया पूर्ण होत नाही. लिंक नसल्याने हा सर्व गोंधळ सुरू आहे.

आणखी आठवडाभर समस्या जैसे थे?
धान्य मिळण्याची वाट पाहत गोरगरीब सकाळ पासून दुकानासमोर ताटकळत बसुन राहतात. कघी कधी दुपारी लिंक मिळते तर कधी दिवसभर लिंकच राहात नाही. आज बुधवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळ पासून मशिन बंद आहे. यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते धान्य वाटप करू शकत नाही. दुकानदारांना सांगण्यात आले की आठवडाभर सुरू होण्याची शक्यता नाही.

यापूर्वीही अनेक वेळा अशा अडचणी आलेल्या आहेत. मशिनमध्ये पीएम योजनेचा क्वोटाही दिसत नाही आहे. कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यासाठी प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वाटप केले जात होते. परंतु मशिनमध्ये पीएम योजनेच्या धान्याचा क्वोटा दर्शविला जात नसल्याने या योजनेचा लाभही नागरिकांना मिळाला नाही.

रेशन धान्यातील काळाबाजाराला चाप लावण्यासाठी शासनाने ऑनलाईन धान्य वितरणाची प्रणाली विकसित केली. बार्योंमेट्रीकद्वारे धान्य वितरण सुरु केले. त्यासाठी ई-पॉस मशीनची जोड दिली. पण काळानुरूप हे मशिन अद्यावत करणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्याने मशिनमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येतात व याचा त्रास गोरगरीब लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

हे देखील वाचा:

संपामुळे वणीतील शासकीय कार्यालयात शुकशुकाट, व्यवहार ठप्प

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.