भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवार 4 मे रोजी सकाळी उघडकीस आली. मनीषा अनिल कोवे (30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लागून असलेल्या शेतातील विहिरमध्ये तिचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार 3 तारखेला सायंकाळी मनीषा शौचास जाण्यासाठी निघाली होती. मात्र बराच वेळ होऊन ती परत न आल्याने कुटुंबियांनी गावात शोध घेतले असता ती मिळून आली नाही. बुधवार सकाळी 7 वाजताच्या दरम्यान गावाबाहेर शौचास गेलेल्या काही गावकऱ्यांनी रामदास लांडे यांच्या शेतातील विहिरीत मनिषाचे प्रेत तरंगताना दिसून आले. मनिषाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.
घटनेबाबत वेगाव येथील पोलीस पाटील अरुण निमसटकर यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात सूचना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मनिषाचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा करुन मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतकाच्या मागे पती व एक मुलगी आहे. मनीषा हिने आत्महत्या सारखं पाऊल का उचलले याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.
Comments are closed.