रात्री जागलीसाठी गेलेल्या शेतक-याचा सकाळी आढळला मृतदेह

डोर्ली शिवारातील घटना, कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय व्यक्त

भास्कर राऊत, मारेगाव: रविवाली रात्री शेतात जागली करण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा आज सकाळी मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विलास कर्नूजी गोहोकर (वय 50) असे मृतकाचे नाव आहे. हा घातपात असावा असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

मृतक विलास कर्नुजी गोहोकर यांच्याकडे सुमारे 4 एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमूग पेरल्याची माहिती आहे. त्यासाठी ते दररोज शेतामध्ये जागली करण्यासाठी जायचे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. त्यामुळे काही दिवस ते जागली करण्यासाठी जात नव्हते. नुकतेच त्यांनी जागलीसाठी शेतात जायला सुरुवात केली होती.

रविवारी दि.8 मेला ते शेतात जागलीसाठी गेले. आज सोमवारी सकाळी त्यांचा मोठा भाऊ सतीश गोहोकर हे नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता तिथे त्यांना त्यांचा भाऊ विलास हा खाटेवर आढळून आला नाही. त्यांनी बाजूला बघितले असता खाटेपासून 50 फूट अंतरावर ते खाली मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळले.

घातपाताची शक्यता व्यक्त
सतीश यांना मृतकाच्या नाकावर खरचटल्याची खून दिसून आली. तसेच गळ्याभोवती आवळल्याची खूण आढळली. तसेच घटनास्थळावरून त्यांच्या चपलाही दिसून आल्या नाही. हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा प्रथमदर्शनी संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

गावामध्ये विलास यांचा कोणाशीही वाद नव्हता. तरीही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. विलास यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, सुन आणि इतर आप्तपरिवार आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

झाडाची फांदी अंगावर कोसळून मजुर जागीच ठार

बांधकाम साईटवरील इंजिनियरच निघाला चोरटा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.