जितेंद्र कोठारी, वणी : येथील रजानगर भागात एका घरात लपून-छपून सुरु अवैध वरली मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून 6 जणांना अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही सोमवार 9 मे रोजी सायंकाळी चार वाजता दरम्यान करण्यात आली.
रजा नगर येथे अयाज जहिरुद्दीन शेख याच्या घरात मोबाईल फोन द्वारे यवतमाळ जिल्हा व इतर ठिकाणच्या लोकांकडून हारजीतचा वरली मटका खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी पोलिस स्टाफसह सदर घरावर रेड केली असता 7 इसम मोबाईल फोनवरून मटक्याचे आकडे घेऊन कागदावर उतारा घेत असताना मिळाले. पोलिसांनी त्या घरातून नूरखा हुसेनखा पठाण (59) पंचशिल नगर, प्रेम राजु अडकिने (25) रंगनाथ नगर, निखील अरुण भारती (31) बेलदारपुरा, शेख रफीक शेख अब्बास (35) बुरडपुरा, रोहीत बबन दुर्गे (25) रंगनाथ नगर व अमजद खान इकबाल खान पठाण (38) मोमीनपुरा या सहा इसमाना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीना विचारपूस केली असता अयाज जहीरूद्दीन शेख (44) रा. रजानगर वणी यांच्या सांगण्यावरून वरली मटका उतारा घेत असल्याची कबुली दिली. वरली मटका अड्ड्यावर धाडी दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 8920 रुपये रोख, 29 मोबाईल हँडसेट, 6 दुचाकी वाहन, लॅपटॉप व इतर साहित्य असे एकूण 4 लाख, 25 हजार 230 रुपयांचे मुद्देमाल जप्त केला. मटका संचालक अयाज व अटक आरोपींविरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा व कलम 109 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पो.अ. खंडेराव धरणे, उप वि.पो.अ. संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि. रामकृष्ण महल्ले सपोनि शिंदे व पोलीस पथकाने पार पाडली.पुढील तपास सपोनि माया चाटसे करीत आहे.
हे देखील वाचा –
Comments are closed.