सुर्य आग ओकतोय, महावितरण आगीत तेल ओततोय

तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने मार्डी परिसरातील नागरिक संतापले

भास्कर राऊत, मारेगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही मार्डी परिसरात पाऊस पडलेला नाही. उन्हाच्या तडाख्याने दिवसात अंगाची लाही लाही होत आहे. या ऊन्हात एक मिनिटसुद्धा पंखा, कूलर किंवा एसीशिवाय लोक राहू शकत नाही, अशी स्थिती आहे. कधी नव्हे ती पहिल्यांदाच इतकी गरमी जाणवत आहे. अशा स्थितीत परिसरात मागील तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत असल्याने नागरिक आणखी त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या या अनागोंदी कारभारविरुद्ध मार्डी परिसरातील नागरिक चांगलेच संतापले आहे.

अद्याप मान्सूनच्या पावसाचा ठावठिकाणा नसताना महावितरण कम्पनी कडून मार्डी परिसरात तासंतास विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. मागील 3 दिवसांपासून तर दिवसभर वीज गायब असल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. दिवसभर वीज नसूनही रात्री विजेचे जाणे येणे सुरूच असते. त्यामुळे दिवसभर आराम न भेटणाऱ्याला रात्रसुद्धा जागतच काढावी लागत असल्याची शोकांतिका मार्डी परिसरामध्ये आहे.
वीज आधारित व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहे. याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता मोघम उत्तर देऊन टाळले जात आहे.

वीज बिल भरायला एक दिवस उशीर झाले तर वीज कर्मचारी जोडणी तोडायला वीज ग्राहकाच्या घरी पोहचते. मात्र 3 दिवसांपासून मार्डी परिसराची विज खंडित असताना मारेगाव येथील विद्युत अभियंता दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वीज वितरण कार्यालयात किंवा लाईनमेन यास फोन केलं तर ते फोन उचलत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.