गांधी चौकातील व्यावसायिकाचे हिरे-मोत्याचे दागिने लुटून ठगबाज पसार

पैशाच्या बॅगमध्ये ठेवली होती मीठाची गोणी,

जितेंद्र कोठारी, वणी: हिरे-मोत्यांचे दागिने विकत घेतो असे सांगून एका व्यावसायिकाला लाखोंनी लुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विशेष म्हणजे दागिने घेतल्यानंतर या ठगांनी पैशाची बॅग असल्याचे सांगत चक्क मीठाची गोणी ठेवलेली बॅग व्यावसायिकाला दिली. भामट्यांनी अंदाजे 10 लाखांचे दागिने लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सविस्तर वृत्त असे की विनोद तुलसीराम खेरा (62) रा. गांधी चौक वणी येथील रहिवासी आहेत. त्यांची शहरात सोन्या चांदीचे व्यावसायिक म्हणून ओळख आहे. यांच्या परिचयाचे शहरातील एक डॉक्टर कुटुंब आहे. या डॉक्टर कुटुंबाच्या कारवर आबिद रा. नागपूर नावाचा ड्रायव्हर होता. परिचयामुळे या दोन कुटुंबाचे एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू असायचे. काही महिन्याआधी एक दिवस खेरा यांनी वाहन चालकला त्यांच्याजवळ काही दागिने असून ते चांगल्या किमतीत विकायचे आहे, असे सांगत कुणी ग्राहक असल्यास कळवण्याची विनंती केली.

सहा महिन्याआधी दागिने विकण्याबाबत वाहन चालक आबिद याने खेरा यांची ओळख नागपूर येथील नुरेन नामक एका इसमासोबत करून दिली. नुरेनने खेरा यांची ओळख एसोद्दीन नामक एका इसमासोबत करून दिली. एसोद्दीनने दागिने खरेदी करण्यासाठी एक पार्टी मिळाली असल्याची बतावणी खेरा यांच्याजवळ केली.

मात्र सौदा पक्का करण्याआधी एसोद्दीन याने खेरा यांना दागिने पाहण्याची अट टाकली. दागिने पाहिल्यावरच त्याची किंमत ठरेल असे ही त्याने खेरा यांना सांगितले. त्यानंतर एसोद्दीन हा गेल्या 6 महिन्यात तब्बल 10 वेळ वणीत दागिने पाहण्यासाठी आला. मात्र खेरा यांनी त्याला दागिने दाखवण्यास टाळाटाळ केली. सौदा पक्का होईल तेव्हाच दागिने दाखवण्याची अट टाकली. काही दिवसांआधी या दोघांमध्ये दागिने पाहून लगेच पैसे देण्याचा सौदा पक्का झाला.

मंगळवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एसोद्दीन हा त्याच्या दोन साथीदाला घेऊन वणीला आला. ते तिघे खेरा यांना भेटायला त्यांच्या सोन्याचांदीच्या दुकानावर गेला. तिथे त्यांच्यात दागिने पाहिल्यावर लगेच पैसे देण्याचे ठरले. तसेच रात्री घरी भेटण्याचे निश्चित झाले. रात्री 9 वाजता एसोद्दीन खेरा यांच्या गांधी चौकातील घरी गेला.

असा साधला भामट्यांनी डाव
एसोद्दीन व त्याचे दोन साथीदार घरी पोहोचल्यावर विनोद खेरा यांनी एसोद्दीनला दागिने दाखविले. आरोपीने दागिने रुमालामध्ये गुंडाळून खिशात ठेवले. त्यानंतर एसोद्दीनचे दोन साथीदार एक लाल रंगाची मोठी बॅग घेऊन घरात आले. त्या बॅगमध्ये पैसे आहे सांगत त्यांनी ती बॅग घराच्या आतील रुम मध्ये ठेवली. त्या बॅगला छोटे कुलूप लावलेले होते. बॅगच्या कुलूपची चावी गाडीत राहिली अशी बतावणी करत ते चावी आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडले व तिथून पसार झाले. ते तिघेही पसार झाल्याचे लक्षात येताच खेरा यांनी बॅग उघडली. मात्र बॅगमध्ये त्यांना मिठाची गोणी ठेवलेली आढळली.

एसोद्दीनला दिलेल्या दागिन्यामध्ये मोत्यांनी जडलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या, 1 डायमंड पत्ती हार, खऱ्या मोत्याचा हार (5 लडीचा), गळ्यातील मोत्याची माळ 1, हिरा व माणिक जडलेली अंगठी 1, नाकातली नथ (मुखडा असलेली) 1 असे अंदाजे 10 लाख रुपयांचे वडिलोपार्जित दागिने होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेरा यांनी रात्री 11.45 वाजता 100 नंबर वर कॉल केला. कॉल वरून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. 

शहरात दिवसभर विविध चर्चांना ऊत
घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सकाळी यवतमाळ येथून श्वानपथक आले. त्यामुळे काही वेळातच ही घटना शहरात वा-यासारखी पसरली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्याच त्यांना विशेष मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे वडिलोपार्जित दागिने असताना खेरा यांना त्या दागिन्यांचे वजन व किंमत पोलिसांना सांगता आली नाही.खेरा यांना एक सोन्या चांदीचे व्यावसायिक असून त्या दागिन्यांचे वजन व किंमत पोलिसांना का सांगता आली नाही याबाबत पोलीसही संभ्रमात आहे. 

फिर्यादी विनोद खेरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी एसोद्दीन, नुरेन व इतर एक असे तिघांविरुद्ध भादंविच्या कलम 420, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे करीत आहे.

हे देखील वाचा:

चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.