वरोरा रोडवर दुचाकीची उभ्या ट्रकला जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

शेती बघून गावी परतत असताना घडली दुर्दैवी घटना....

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरालगत असलेल्या टर्निंग पॉइंट रेस्टॉरन्टजवळ एका उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. राहुल शंकर ढवस (28) असे मृतकाचे नाव असून तो भद्रावती तालुक्यातील नागलोन येथील रहिवासी आहे. शेती बघून गावी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार, राहुल ढवस हा नागलोन येथील रहिवासी आहे. त्यांची मारेगाव तालुक्यातील चोपण येथे शेती आहे. आज गुरुवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तो नागलोनहून स्प्लेंडर प्रो या दुचाकीने (MH34 AY8024) चोपण येथे शेती बघण्यासाठी आला होता. शेतीचे काम आटपून तो संध्याकाळी गावी परतत होता.

वणी शहरालगत वरोरा रोडवरील टर्निंग पॉइंट रेस्टॉरन्टलगत असलेल्या आदर्श टेक्निकल इन्स्टीट्यूटजवळ एक कोळसा भरलेला ट्रक (MH34 BZ4309) उभा होता. रात्रीची वेळ असल्याने हायवेवर समोरून आलेल्या वाहनामुळे राहुलचे डोळे दीपले व त्याच्या दुचाकीची उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागला. अपघात झाल्याचे लक्षात येताच या मार्गावरून जाणा-या प्रवासी मदतीसाठी थांबले. मात्र मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याच्या डोक्यातून अतिरक्तस्राव झाला व राहुलचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावरील लोकांनी अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम 283, 304 अ व सहकलम 122, 177, 134 अ ब मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. राहुलच्या पश्चात आई, बहीण, भाऊ असा आप्त परिवार आहे.

दुचाकीस्वारांना हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’ तर्फे करण्यात येत आहे.

सध्या वणी-वरोरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर अनेक ठिकाणी वन वे वाहतूक सुरू आहे. हायवे असल्याने या मार्गावर वाहने भरधाव असतात. त्यामुळे इथे सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत.

हे देखील वाचा: 

 

ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.