शिरपूरजवळ ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक, 3 वर्षाची चिमुकली व आई ठार

विवेक तोटेवार, वणी: वणी-कोरपना रोडवर आबई फाट्याजवळ ऑटो व ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ऑटोतील एक 3 वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली तर उपचारासाठी नेताना वाटेत मुलीची आई देखील दगावली. या अपघातात ऑटोतील 6 लोक जखमी असून यातील ऑटोचालकासह 2 महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

Podar School 2025

शिंदोला येथील ऑटो चालक सुनील बोंडे हा ऑटोने (MH29 AM 0013) वणी येथे सिटा घेऊन आला होता. दुपारच्या सुमारास तो काही महिलांना घेऊन वणीहून शिंदोला येथे परत जात होता. दुपारी 4.30 वाजताच्या शिरपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आबई फाट्याजवळ कोरपनाहून वणीच्या दिशेला सिमेंट घेऊन येणा-या ट्रकची (HR 58 C 0482) ऑटोला भीषण धडक बसली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हा अपघात इतका गंभीर होता की यात ऑटोचा समोरील भाग चेपकला गेला. ऑटोतील कुर्ली येथील रहिवासी असलेली अवनी अनंता नागतुरे ही तीन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाली. तर 6 जण जखमी झाले. यातील 2 महिला व ऑटोचालक गंभीर जखमी आहे. मुलीची आई संजीवनी अनंता नागतुरे (35) ही महिलाही गंभीर जखमी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर लोक गोळा झाले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील लोकांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था केली.

उपचारासाठी नेताना वाटेतच संजीवनी अनंता नागतुरे हिचा मृत्यू झाला. तर अनिता जीवन, संगीता जिरे, सुनील बोन्डे, प्रकाश मडावी, दर्शना मडावी, अंबादास जिरे अशी जखमींचे नावे आहेत. ऑटोचालक सुनील बोंडे व 2 महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दीपक चौपाटीवर रात्री राडा, एकाला बेदम मारहाण

Comments are closed.