मारेगाव-वणी राज्य महामार्गांवर अपघात, दोन महिला गंभीर

भास्कर राऊत मारेगाव: तालुक्यातील मारेगाव-वणी रस्त्यावर गौराळा फाट्याजवळ गुरूवारी दि. 24 ऑगस्टला दोन दुचाकी खड्ड्यावरुन उसळून पडल्या. वेगवेगळ्या झालेल्या या अपघातात दोन महिला जखमी झाल्या. सुनिता नागेश खंडाळे (30) रा. वरोरा जि. चंद्रपूर व लता विलास देउळकर (50) रा. गोंडबुरांडा ता. मारेगाव असे जखमी महिलांचे नाव आहे. दुपारच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या. यातील एकाला चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

सुनिता नागेश खंडाळे या त्यांच्या पतीसह वरोरा येथून आपल्या माहेरी वेगाव येथे येत होत्या. दरम्यान गोराळा बस स्टॉप पासून काही अंतरावर असलेल्या खड्यामध्ये त्यांची दुचाकी गेली. खड्ड्यामुळे तोल गेल्याने त्यांची दुचाकी खाली पडली. यात सुनीता गंभीर जखमी झाली. तिला प्रथम मारेगाव येथील जनहित कल्याण संघटनेने ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. परंतु जखम गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविल्याची माहिती आहे.

लता विलास देउळकर व त्यांचे पती काही कामानिमित्त वणी येथे गेले होते. वणीतील काम आटपून ते गावी परतत होते. दरम्यान गौराळा जवळ महामार्गावर असलेल्या खड्यामुळे त्यांच्या पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी पडली. यात लता या जखमी झाल्यात.

राज्य महामार्गावरील खड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
मारेगाव वणी हा राज्य महामार्ग आहे. या महामार्गाने मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते. या महामार्गांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथे किरकोळ स्वरूपाचे अनेक अपघात घडले आहे. अपघात किरकोळ असल्याने याची कोणीही तक्रार केली नाही. परंतु या मार्गांवर असलेले खड्डे बांधकाम विभागाला दिसत कसे नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.