मांगली शेतशिवारात शेतमजुराचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

भास्कर राउत, मारेगाव: तालुक्यातील मांगली शिवारात एका 65 वर्षीय वृद्धाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती शेंद्रे रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या अंगावर हत्याराचा वार असल्याने ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की कुंभा परिसरातील मांगली शिवारात बाळू पांढरे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात मारोती शेंद्रे हे मजुरी करतात. आज दिवस सकाळी त्यांची आणि मालकाची भेट झाली. त्यानंतर सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतमालक वणी येथे गेले होते. त्यानंतर मृतक शेतात सफाईचे काम करीत होता. दुपारी आजूबाजूच्या शेतातील मजूर जेवणासाठी गेले. त्यानंतर 2.30 वाजताच्या सुमारास शेतातील रस्त्यालगत त्यांचा मृतदेह आढळून आला.

सदर मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत होता. तसेच त्यांचा मोबाईल मृतदेहाच्या कडेला पडून होता. घटनास्थळवरील लोकांनी याची तातडीने मारेगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला. सध्या मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

मृतकाच्या कानावर व गळ्यावर मार असल्याने सदर घटना ही हत्या असल्याचा अंदाज बांधला जात आहे. काही लोकांनीदुपारी 2 पर्यंत मृतकाला बघितले होते. त्यामुळे दुपारी 2 नंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे कुंभा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.