शुल्लक कारणावरून सिंधी कॉलोनीतील रेस्टॉरन्टमध्ये राडा

एकाला मारहाण, 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: सिंधी कॉलोनीतील एका रेस्टॉरन्टमध्ये शुल्लक कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीनंतर सिंधी कॉलोनीतील 40-50 तरुणांनी एकत्र येत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सुदामा साधवानी यांच्या तक्रारीवरून आरोपी सुधीर पेटकर व त्याच्या साथीदारा विरोधात रात्री उशिरा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, तक्रारदार सुदामा हरीदासमल साधवानी (60) हे सिंधी कॉलोनी येथील रहिवासी आहे. ते रेडिमेड कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. सिंधी कॉलोनीत कॉलिटी रेस्टॉरन्ट नामक एक धाबा (भोजनालय) आहे. क्वालिटी रेस्टॉरन्टचे मालक दीपक वाधवानी यांच्याशी सुदामा यांची मैत्री आहे. ते रोज रात्री जेवन झाल्यावर ते रेस्टॉरन्टमध्ये जाऊन मालक दीपक यांच्याशी गप्पा गोष्टी करतात.

शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ते घरी जेवण झाल्यावर नेहमी प्रमाणे क्वॉलिटी रेस्टॉरन्ट मध्ये गेले. तिथे ते दीपक वाधवानी यांच्याशी गप्पा मारीत होते. त्याचवेळी तिथे सुधीर पेटकर हा त्याच्या एक साथीदारासोबत टेबलवर बसला होता. त्या दोघांनी सुदामा यांना जेवण करण्यास बोलवले. मात्र सुदामा यांनी जेवण झाल्याचे सांगून त्यांना जेवणास नकार दिला. सुधीर याचा साथीदार याने जेवण करायचे नसेल तर आमचे पैसे दे असे म्हणत टेबलवरचा ग्लास उचलून सुदामा यांच्या दिशेने फेकला. त्यापाठोपाठ सुधीर याने देखील टेबलवरील काचेचा ग्लास उचलून सुदामा यांच्या दिशेने फेकला. फेकलेला ग्लासामुळे सुदामा यांच्या हाताला इजा झाली.

त्यानंतर दुस-या साथीदाराने हॉटेलमधील लोखंडी गरम तवा घेऊन सुदामा यांच्या तोंडावर मारला. त्याच वेळी सुधीर हा हॉटेलमधले कुकर घेऊन अंगावर मारायला धावला. मात्र हा वार त्यांनी रोखून धरला. त्यानंतर सुधीर याच्या साथीदाराने डाव्या हातातील अंगठी हिसकवून घेतली. झालेल्या प्रकारामुळे घाबरून सुदामा यांनी घराकडे पळ काढला. मात्र दोन्ही आरोपींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना गाठले व त्यांना घरातून ओढून मारहाण केली. दरम्यान सुदामा यांचे लहान भाऊ व पुतण्या सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली.

पोलीस स्टेशन समोर तरुणांचा ठिय्या
घटना घडल्यानंतर तक्रारदार व आरोपी दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे देखील आरोपींनी तक्रारदाराला धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सिंधी कॉलोनीतील 40-50 तरुण पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या मांडला. यामुळे काही काळ पोलीस स्टेशनसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस कर्मचारी आणि सिंधी समाजाच्या मुखियानी तरुणाची समजूत काढल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणली.

या प्रकरणी आरोपी सुधीर पेटकर व त्याचा साथीदार याच्याविरोधात भादंविच्या कलम 394, 452, 294, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात पो. उ. दत्ता पेंडकर करीत आहे.

हे देखील वाचा: 

दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

जत्रा मैदान परिसरात गांजा ओढणा-या तरुणास अटक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.