विवेक तोटेवार, वणी: बस पकडण्याच्या गडबडीत एका प्रवाशाला बसची धडक लागली. बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाला एक पाय गमवावा लागला. आज शुक्रवारी दिनांक 11 रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद ढेंगळे (32) रा. खडकी गणेशपूर ता. झरी असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. विनोदला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी विनोद हा बसस्टँडवर बाहेरगावी जाण्यासाठी पोहोचला होता. दुपारी 4 वाजताच्या सुमारास नांदेडहून गडचिरोली-नांदेड ही गडचिरोली डेपोची बस (MH40 CM4638) बस स्थानकात आली. बसने प्लॅटफॉर्म क्रमांक एक कडे वळण घेतले. त्याच वेळी बस पकडण्यासाठी विनोद हा बससमोर गेला. मात्र तोल जाऊन तो खाली पडला.
अचानक खाली पडल्याने बसचे पुढले चाक विनोदच्या एका पायावरून गेले. यात त्यांचा पाय चेंदामेंदा झाला. अपघात होताच बस स्थानकावर असलेल्या लोकांनी ऍम्बुलन्स बोलवली व त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. विनोद हा कुठल्या गावात जात होता. याची माहिती मिळू शकली नाही.
Comments are closed.