मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…. 

आजाराला कंटाळून युवकाची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: आशा माणसाला कोणत्याही परिस्थितीत जगवते. जगण्याची दिशा देते. मात्र नैराश्याचं सावट आलं, की आत्मबळही डगमगायला लागतं. त्यानं नुकताच उमेदीच्या वयात प्रवेश केला होता. आपल्या परिश्रमानं नवीन विश्व उभारण्याची स्वप्नही पाहिली असतील. मात्र एक भयंकर निराशाच त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. त्यातूनच मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील युवा शेतकरी दीपक भास्कर रामटेके (25) याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली.

दीपक काही काळापासून आजारानं ग्रस्त होता. चंद्रपूर येथील एका दवाखान्यात तो उपचार घेत होता. त्याचे नित्याचे व्यवहारही सुरूच होते. असात तो शुक्रवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडला. जाताना कुटुंबियांना बाहेर जाऊन येतो असं सांगितलंही. सकाळपासून बाहेर गेलेला दीपक संध्याकाळ झाली तरीही घरी परत आला नाही. त्यामुळे परिवारातील सदस्य चिंतेत पडलेत.

तो परत न आल्याने संबंधितांना विचारपूस केली. त्याचा इकडे तिकडे शोधही घेतला. केली. मग शनिवारची सकाळ झाली. सकाळी 7 च्या सुमारास गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उंबराच्या झाडाला दीपक गळफास घेऊन लटकलेला अवस्थेत दिसला. तोपर्यंत गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. वेगावच्या पोलीस पाटलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेहाचा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दीपकच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किसन शुंकुरवार करीत आहे. एका तरुणाच्या अकाली जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.