बहुगुणी डेस्क, वणी: दारूच्या नशेच माणूस कोणती पातळी गाठेल हे सांगता येत नाही. एक वर्षीय मुलीला लाथ लागण्याचं कारण झालं. नंतर त्याने तर आपल्या पत्नीचं दगडानंच डोकं फोडलं. मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर या गावात 24 जूनला दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार झाला. याबाबत पत्नीने पोलिस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर या गावात भीमराव महादेव आत्राम (35) राहतो. तो दारूच्या प्रचंड आहारी गेला आहे. मंगळवारी असाच तो दारू पिऊन घरी आला. नेहमीप्रमाणेच पत्नीशी नेहमी वाद घातला. तिला विनाकारण मारहाण केली. त्यांच्या दोन मुलीही घरातच खेळतच होत्या. भीमराव दारूमुळे नियंत्रणाबाहेर गेला होता.
त्यात त्याची केवळ 1 वर्षाची लहान मुलीला त्यानं धक्का दिला. त्यामुळं ती जमिनीवर पडली. वेदनांनी ती रडायला लागली. त्यामुळे पत्नीनं मुलीला धक्का का मारला म्हणून जाब विचारला. दारूनं तर्र झालेला भीमराव वरून पत्नीलाच शिवीगाळ करू लागला. तिच्याशी नाहक वाद घालायला लागला. तिथलाच एक दगड उचलला. पत्नीच्या डोक्यावर मारून तिला जखमी केले. पत्नीने त्याला विचारल्यावर एखादे दिवशी तिला जिवानिशीच ठार मारतो, अशी धमकी दिली.
भीमराव आत्रामच्या दारूच्या व्यसनामुळे पत्नीला प्रचंड वैताग आहे. तो घराची जबाबदारीही स्वीकारत नाही. त्यामुळे ती स्वतः रोजमजुरी करून संसाराचा डोलारा सांभाळते. 24 तास दारूच्या नशेत तो पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो. आपल्या मुलींचीही तो हेळसांड करतो. पतीच्या या नेहमीच्याच कृत्याने पत्नीचा संयम अखेर तुटला. शेवटी पती विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी भीमराव आत्राम याच्यावर बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हे दाखल केलेत. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.



Comments are closed.