काय आहेत एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या समोरील आव्हानं ?

हिंगोली ग्रामीणचे सुरेश दळवे वणीचे नवे एसडीपीओ, गणेश किंद्रे यांची बदली

 

निकेश जिलठे, वणी: उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचा वणी येथील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची मुंबई येथे पोलीस उप अधीक्षक (फोर्स वन) म्हणून प्रशासकीय बदली झाली आहे. मे 2023 पासून वणीचे एसडीपीओ म्हणून त्यांनी काम केले. त्यांची कामगिरी समाधानकारक म्हणता येईल. काही क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावला. त्यांच्या कार्यकाळात वणी एसडीपीओ कार्यालय अमरावती विभागात अव्वल ठरले. त्यांच्या जागी हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे वणीचे एसडीपीओ म्हणून पदभार सांभाळणार आहेत. एक जेष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

काय आहेत सुरेश दळवे यांच्यासमोरील आव्हाने ?
वणी उपविभाग हा त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष महत्त्वाचा आहे. एक आदिवासी बहुल व खनिज संपत्तीने समृद्ध परिसर अशी या परिसराची ओळख आहे. वणी उपविभागात वणी, शिरपूर, मुकुटबन, पाटण व मारेगाव पोलीस स्टेशनचा समावेश आहे. एक मलईदार परिसर इथले पोलीस स्टेशन ओळखले जाते. दक्षिणेला तेलंगणाची सीमा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात जणावरांची तस्करी होते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. तसेच गेल्या काही महिन्याआधी गोहत्येचा मुद्दा देखील गाजला होता. वणीतील जत्रा मैदान परिसरातून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त करण्यात आले होते. हे प्रकरण 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ओव्हरलोड वाहतूक, रेती व खनिज चोरी
परिसरात मोठ्या प्रमाणात खाणी असल्याने येथून मोठ्या प्रमाणात कोळसा, सिमेंट, गिट्टी, मुरुम तसेच खनिज संपत्तीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असेत. जड व ओव्हरलोड वाहनांकडून येथे मोठ्या प्रमाणात वसुली चालते. तसेच उपविभागात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी चालते. यावर अनेकदा कारवाई देखील होते. मात्र ही वरवरची कारवाई असते. दर वेळी चालकावर गुन्हा दाखल केला जातो मात्र मुळ तस्कर मात्र मोकाटच असतो.  

अवैध दारूविक्री, मटका-सट्ट्याचा सुळसुळाट
परिसरात मटका मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. शहरात व ग्रामीण भागात राजरोसपणे मटका चालतो. यावर वेळोवेळी पोलिसांची धाड पडते. मात्र शे पाचशेचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुन्हा मटका सुरु होतो. अलिकडेच वणीत ऑनलाईन मटका सुरु असल्याचे देखील समोर आले आहे. क्रिकेट मॅच सुरु झाली की सट्टेबाजीला उधाण येते. ग्रामीण भागात अवैध दारुविक्रीची मोठी समस्या आहे. रस्त्यावरील अनेक फाट्यावर राजरोसपणे दारुची अवैधरित्या विक्री होते. तसेच गावातील अनेक घरातून देखील देशी-विदेशी दारूची विक्री होते.   

घरफोडीने त्रस्त वणीकर
सध्या वणीत मोठ्या प्रमाणात घरफोडीचे सत्र सुरु आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हे सत्र अविरत सुरु आहे. एका ठाणेदाराची बदली देखील चोरट्याने घरमालकावर हल्ला केल्याने झाली आहे. काही अपवादात्मक घटना सोडल्या तर कोणत्याही प्रकरणाचा अद्यापही छडा लागलेला नाही. या चोरट्यांचा इतका उन्माद आहे की बंद घर म्हणजे घरफोडी असे एक समीकरण बनले आहे. विशेष म्हणजे नुकतेच एकच घर चोरट्यांनी दुस-यांदा फोडल्याचा देखील प्रकार येथे घडला आहे. तसेच गेल्या वर्षी पोळ्याच्या वेळे मारेगाव शहरात एकाच रात्री चोरट्यांनी 10 ते 12 घरं फोडली होती.

ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाईंट मोकाटच !
वणी शहरात गेल्या काही वर्षांपासून गांजाची तस्करी सुरु आहे. तरुण तसेच शाळकरी मुलं याच्या आहारी गेले आहेत. अलिकडेच वणीत एमडी या ड्रग्जची तस्करी देखील समोर आली होती. दर वेळी केवळ गांजा सेवन करणा-यांवर कारवाई केली जाते. मात्र ड्रग्ज पेडलरवर व तस्करावर कोणताही कारवाई होत नाही. त्यामुळे ड्रग्जची कारवाई केवळ सेवन करणा-यांपुरतीच मर्यादीत झाली आहे. असे अनेक आव्हानं सुरेश दळवे यांच्यासमोर आहेत. 

सुरेश दळवे यांची एक अनुभव व ज्येष्ठ अधिकारी अशी ओळख आहे. पोलीस विभागात त्यांचा दीर्घ अनुभव आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण येथील त्यांचा अनुभव, विशेषतः ग्रामीण भागातील गुन्हेगारी नियंत्रणाचा त्यांचा अनुभव वणी येथे उपयुक्त ठरू शकतो. त्यांच्याकडून वणी व उपविभागातील नागरिकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

Comments are closed.