एका चोरट्याने पळवला चक्क ट्रक तर दुस-याने ट्रॅक्टरची ट्रॉली

सावधान... ! दुचाकीनंतर आता अवजड वाहन चोरट्यांच्या रडारवर

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगळ्या आश्चर्यकारक चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेत चोरट्यांनी चक्क रात्री गॅरेजवर लावलेला ट्रकच चोरून नेला. लालपुलिया परिसरात ही घटना घडली. तर दुस-या घटनेत शेतात लावलेली ट्रॅक्टरची ट्रॉलीच चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मोक्षधाम जवळील एका शेतात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आधी दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता मोठे वाहन देखील चोरीला जात असल्याने वाहन मालकांची चिंता चांगलीच वाढली आहे.

ट्रक चोरी प्रकरण हे 13 ऑगस्ट रोजी उघडकीस आले. फिर्यादी खुशनुर खान रफिक खान (वय 48, व्यवसाय ट्रान्स्पोर्टिंग) हे महाजननगर, न्यू माजरी कॉलनी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे  टाटा मोटर्स कंपनीचा ट्रक (क्र. MH34AB4447) ज्याची कॅबिन पांढरी-हिरवी तर बॉडी नारंगी आहे. त्यांच्या ट्रकवर राममुरत राजाराम केवट (वय 46) हे चालक म्हणून काम करतात. दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ट्रकचे काम असल्याने चालकाने ट्रक लालपुलीया, वणी येथील जाहीद अली यांच्या गॅरेजवर नेला होता.

रात्री ट्रक परत आणण्यासाठी चालक राममुरत गेले. मात्र ट्रकचे थोडे काम शिल्लक असल्याने त्यांना ट्रक परत नेता आला नाही. त्यांनी ट्रक लॉक करून चाबी सोबत ठेवली होती. परंतु दुस-या दिवशी म्हणेज 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता ते ट्रक परत आणण्यासाठी गेले असता तिथून ट्रक गायब असल्याचे लक्षात आले. शोध घेतल्यानंतरही ट्रक मिळाला नाही. त्यांनी ही घटना मालकाला सांगितली. त्यांनी चोरीचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. ट्रकची किंमत अंदाजे 10 लाख रुपये आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ट्रॉली चोरीची घटना ही 11 ऑगस्टला घडली. फिर्यादी हरीश कीसनराव मोहबिया (वय 35) हे रंगारीपुरा वणी येथील रहिवासी असून त्यांचा मोक्षधाम जवळ विटभट्टा आहे. त्यांच्याकडे NK कंपनीची ट्रॅक्टरची ट्रॉली (क्र. MH 29CB-4936) आहे. या ट्रॉलीचा वापर ते विटभट्ट्याच्या कामासाठी करतात. 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरच्या चालकाला शेतातून ट्रॉली गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती मालक हरीशला दिली. दोघांनीही ट्रॉलीचा परिसरात शोध घेतला. अनेकांकडे विचारपूस केली. मात्र ट्रॉली मिळाली नाही. अखेर त्यांनी चोरीचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात इसमांविरुद्ध बीएनएस कलम 303 (2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, वणी पोलिस तपास करीत आहेत. आधी दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता मोठे वाहन देखील चोरीला जात असल्याने वाहन मालकांची चिंता चांगलीच वाढली आहे.

RN सोलर सिस्टीमची झटका मशिनवर पोळा, गणेशोत्सव ऑफर सुरु

Comments are closed.