महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
राजू कांबळे, झरी: यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारूबंदी आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा या मागणीसाठी स्वामिनी संघटनेने पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आालं. झरी तालुक्यात देखील या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनी स्वामिनी संघटनेच्या महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून स्वामिनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलन करीत आहे. याबाबत शासन दरबारी त्यांची चर्चाही झाली. मात्र दर वेळी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे यावेळी स्वामिनी संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनचे शस्त्र उपसले आहे. जर शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा स्वामिनी संघटनेचे महेश पवार यांनी दिला.