प्रगतीनगरात घरफोडीचा धक्का! निवृत्त शिक्षकाच्या घरी चोरी
भुरट्या चोरट्यांनी लंपास केली टीव्ही आणि होम थिएटर
बहुगुणी डेस्क, वणी: प्रगतीनगर वॉर्ड क्रमांक 3, वणी येथे राहणाऱ्या निवृत्त शिक्षक वसंत माणिकदास ठमके यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे ₹21,000 किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना 6 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठमके हे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी पत्नीसमवेत विजयादशमी निमित्ताने नागपूरला मुलाकडे गेले होते. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:00 वाजता शेजारी राहणाऱ्यांनी फोन करून घरातील लाईट सुरू असल्याची व कपाटाचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.
ठमके यांनी वणीतच राहणारे त्यांचे जावई यांना संपर्क करून घराची पाहणी करण्यास सांगितले. जावयांनी घरी जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. त्यांनी तत्काळ पोलीसांना माहिती दिली.
ठमके व त्यांचा मुलगा 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 वाजता घरी परतले असता, घरातील समोरील खोलीतून SONY कंपनीचा 32 इंची LED टीव्ही (₹12,000) आणि Ahuja कंपनीचा होमथिएटर व दोन माईक (₹9,000) असा एकूण ₹21,000 किमतीचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. वणी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



Comments are closed.