कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या वणीत भाजपचे पाय मजबूत !

भाग 4: कुठे गेले पारंपरिक मतदान? महाविकास आघाडी कागदावरच? का झाला काँग्रेसचा पराभव

निकेश जिलठे, वणी: “जिन्हें बरसों तक अपना समझते रहे, वही सबसे पहले हमसे दूर चले गए।” पारंपरिक मतांचा जेव्हा विचार होतो. तेव्हा त्यात काँग्रेसचा क्रमांक पहिला येतो. आज सर्वाधिक पारंपरिक मतांचा मोठा आकडा केवळ काँग्रेस व भाजपकडेच आहे. इतर पक्षांकडे हा आकडा अत्यल्प आहे. जसे भाजपकडे काही पारंपरिक मतदान आहे. तसेच आदिवासी, बुद्धीस्ट व मुस्लिम मतदान हे काँग्रेसचं हक्काचं मतदान मानलं जातं. भाजप आणि काँग्रेसचा विचार केला तर पारंपरिक मतांच्या बाबतीत काँग्रेस एक पाऊल पुढे आहे. मात्र ही पारंपरिक मतांची साथ कागदावर जरी दिसत असली, तरी त्याचा यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाव दिसून आला नाही. परिणामी काँग्रेसला केवळ 11 पैकी 3 जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीचे वैशिष्टं म्हणजे पहिल्यांदाच काँग्रेसचे पारंपरिक मत ओढण्यात भाजपला यश आलं व या भागातून पहिल्यांदाच भाजपनं लीड घेतली. त्यामुळे याचा परिणाम केवळ नगरपालिकेपुरता नाही तर दूरगामी परिणामही दिसून येणार आहे. 

प्रभाग क्रमांक 13 अ व ब तसेच प्रभाग क्रमांक 6 अ या तीन जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. यातील प्रभाग क्रमांक 13 हा काँग्रेसचे इजहार शेख यांचा गड मानला जातो. तर प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये विजयी झालेल्या करुणा कांबळे या स्वत: सक्षम उमेदवार आहे व त्या माजी नगराध्यक्ष देखील राहिल्या आहे. त्यांच्याकडे निवडणुकीत काम करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. इतर ठिकाणी काँग्रेसच्या हाती निराशाच आली. 8 जागांपैकी प्रभाग 12 अ, 12 ब व 7 अ व 5 ब मध्ये काँग्रेस दुस-या स्थानी, 14 अ, 11 अ, 8 अ मध्ये तिस-या स्थानी तर तर 11 ब मध्ये काँग्रेस पाचव्या स्थानावर फेकली गेली. प्रभाग 5 ब मध्ये काँग्रेस दुस-या स्थानी असली तर येथे भाजपचा उमेदवार काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट मतांनी निवडून आला. कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या वणीत काँग्रेसचा पराभव का झाला? याचे विश्लेषण आपण करणार आहोत. काँग्रेसच्या पराभवाची कारणं आणि त्याचा दूरगामी परिणाम यावरही चर्चा करणार आहोत.

जागावाटपातच काँग्रेस हरली
काँग्रेसच्या पराजयाची सुरुवात ही जागावाटपासूनच झाली. नगराध्यक्ष पद हे शिवसेना उबाठाकडे गेल्याने काँग्रेसला उबाठा पेक्षा अधिक किंवा समसमान जागा मिळणे अपेक्षीत होतं. मात्र जागावाटपाच्या वाटाघाटीत काँग्रेसच्या वाटेला केवळ 12 जागा आल्यात तर उबाठाला 17 जागा मिळाल्या. जागावाटपाच्या घोळामुळे प्रभाग क्रमांक 14 अ मध्ये उबाठा व काँग्रेस एकमेकांविरोधात होते. तर 14 क मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारच नव्हता. कमी जागा पारड्यात का पडल्या किंवा कुणामुळे पडल्या? याचे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांकडे नाही. मिळालेल्या अत्यल्प जागेत कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागणार होती. कमी जागा मिळाल्याने काँग्रेसचा सुरुवातीलाच आत्मविश्वास खचला. जागावाटपाच्या वाटाघाटीत हरल्याने काँग्रेस दुखावली गेली. त्याचा परिणाम संपूर्ण निवडणूक कालवधीत दिसून आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव
नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागावाटपापासून सुरु झालेला समन्वयाचा अभाव हा अखेर पर्यंत टिकून राहिला. महाविकास आघाडी ही केवळ कागदावरच उरली. प्रत्यक्षात अशी कोणतीही आघाडी ग्राउंड लेव्हलवर दिसत नव्हती. जेव्हा एकत्र लढल्या जाते तेव्हा एकत्रीत नियोजन केले जाते. मात्र असे एकत्रीतपणे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. उबाठा आपले उमेदवार निवडून आणण्यात तर काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या प्रचारात मग्न होते. एक-दोन जागेसाठी तर उबाठाचे पदाधिकारीच काँग्रेसचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करीत होते.

काही प्रभागातील एक जागा उबाठाकडे तर एक जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे मतदार देखील गोंधळला. कोणत्या प्रभागात कोण नेतृत्व करणार, प्रचाराची जबाबदारी कोणाकडे असणार, तसेच ज्या प्रभागात दोन्ही पक्षाचे एक-एक उमेदवार होते. अशा ठिकाणी संयुक्त भूमिका काय असणार, याबाबत स्पष्टता नव्हती. समन्वयाचा अभाव केवळ निवडणूक व्यवस्थापनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो मतदारांपर्यंतही पोहोचला. यातून महाविकास आघाडी एकसंघ नसल्याचा संदेश गेला. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना (उबाठा) असे एकत्रीत मतांचे गणित बिघडले.

गटबाजीचा मोठा फटका
केवळ महाविकास आघाडीतच नव्हे तर काँग्रेस पक्षात अंतर्गत समन्वयाचा अभाव होता. काँग्रेस पक्षात दोन गट असल्याचे सर्वश्रुत आहे. वामनराव कासावार यांच्याकडे काँग्रेसचे नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व होते. त्यांच्या साथीला इजहार शेख होते. आघाडीच्या निर्णयापासून ते जागावाटपापर्यंतच्या निर्णयाचे अधिकाधिक हक्क हे एकाच गटाकडे गेले. त्यामुळे आपल्या गटातील इच्छुक उमेदवारांना तिकीट वाटपात व जागा वाटपात पसंती दिली गेली. तर दुस-या गटाचा उमेदवार इच्छुक असलेल्या जागा उबाठासाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे दुस-या गटातील निष्ठावंत असलेले कार्यकर्ते दुखावले गेले.

काँग्रेसमध्ये शहरात व ग्रामीण भागात कार्यरत आणि पकड असलेले दोन प्रकारचे नेते किंवा पदाधिकारी आहेत. जागावाटप व उमेदवार निवडीची जबाबदारी असलेल्या कमिटीत ग्रामीण भागातील नेते होते. त्यांना शहरातबाबत किंवा पालिका निवडणुकीबाबत विशेष अनुभव नव्हता. तर शहरात कायम कार्यरत असलेली टीम ही जागावाटप, नियोजन, निवडणूक रणनिती इत्यादी प्रक्रियेपासून दुर ठेवण्यात आली. त्यामुळे शहरी मतदारांचा, पालिका निवडणुकीचा पूर्वानुभव असलेली काँग्रेसची टीम दुखावली गेली. परिणामी शहरातील टीमचा सहभाग केवळ नाममात्र ठरला.

निवडणुकीची अधिकृतपणे जबाबदारी ही शहर प्रमुखांकडे असते. मात्र निर्णय प्रक्रियेपासून शहर अध्यक्षांना दूर ठेवण्यात आले. हा गोंधळ इतका मोठा होता की जागावाटपाच्या काळात भर मिटींगमध्ये शहर अध्यक्ष असलेले डॉ. महेंद्र लोढा यांनी मी केवळ नाममात्र आहो असे जाहीर केले होते.

महाआघाडीमुळे कार्यकर्ते नाराज
नगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. त्यामुळे अशा निवडणुकीत प्री अलायन्स पेक्षा पोस्ट अलायन्सला अधिक महत्त्व दिले जाते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेला वणी विधानसभा क्षेत्रातील दणदणीत विजय लक्षात घेऊन काँग्रेसने यावेळी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे काँग्रेसचे स्थानिक पातळीवर पक्षाचे काम करणारे अनेक निष्ठावंत इच्छुक उमेदवार नाराज झालेत. प्रमोद लोणारे सारख्या कित्येक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला नाईलाजाने अपक्ष म्हणून लढावे लागले. यासह दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जागा वाटपात उबाठाने आघाडी घेतल्याने निवडून येण्याची क्षमता असलेले काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असलेले उमेदवार उबाठाकडे गेले. यातील काँग्रेसचा एक अनेक वर्षांपासूनचा निष्ठावंत कार्यकर्ता उबाठाकडून निवडून देखील आला.

संजय खाडे ठरले नामधारी
गेल्या तीन-चार वर्षांपासून काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेले संजय खाडे यांनी काँग्रेसमध्ये उभारी आणली. त्यांचा शहरात चांगला जनसंपर्क व प्रभाव आहे. त्यांनी वणीत मोर्चा, आंदोलन जोमाने यशस्वी करून दाखवले. वणी विधानसभा क्षेत्रात कधीही रस्त्यावर न उतरणारी काँग्रेस लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर दिसू लागली. परिणामी संजय खाडे हे एक नेतृत्त्व म्हणून उदयास आले. एक ऍक्टिव्ह व सर्व बाजूंनी परिपूर्ण म्हणून ही निवडणूक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात लढली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते केवळ नामधारी उरले. त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. मात्र त्याला मर्यादा आल्या. त्यांच्या हातात नेतृत्व असतं तर काँग्रेसला आणखी चांगली कामगिरी करता आली असती.

ज्येष्ठ नेते निवडणुकीपासून दूर
काँग्रेस कुणाच्या नेतृत्त्वात निवडणूक लढत आहे, हे अखेर पर्यंत वणीतील मतदारांना कळलेच नाही. वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढली गेली असेल तर ते कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात दिसले नाही. ते केवळ जागावाटपाच्या दरम्यानच वणीत दिसले. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्त्वात किंवा मार्गदर्शनात म्हणावं तर त्या देखील एकदाही कोणाच्या प्रचारासाठी आल्या नाही. इतकंच काय तर नगराध्यक्षाच्या प्रचारासाठीही त्या आल्या नाही. असं म्हटले जातं की खा. प्रतिभा धानोरकर यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आलं. त्यांना कुठल्याही प्रचाराचं किंवा रॅलीचं आमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांनी देखील वणीच्या निवडणुकीपासून दूर राहून इतर ठिकाणी आपले लक्ष केंद्रीत केलं. खासदार असलेली व्यक्ती सोबत राहिली असती तर त्याने कार्यकर्त्यांचा व उमेदवारांचा उत्साह वाढला असता. तसेच त्याचा सर्वसामान्य मतदार व कुणबी मतदारांवरही परिणाम झाला असता. 

 

पारंपरिक मतदान भाजपनं पळवलं !
मुस्लिम, बुद्धीस्ट, आदिवासी समाजातील मतदान हे पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचे मतदान मानलं जातं. मात्र समन्वयाचा अभाव, निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये असलेला गोंधळ, गटबाजी, नेतृत्त्वाचा अभाव याचा काँग्रेसच्या पारंपरिक मतदानावर परिणाम झाला. या पारंपरिक मतदारांकडे लक्ष देणारं कुणीच नसल्यानं हे मतदान भाजपनं आपल्याकडे खेचलं. या पारंपरिक मतदारांचा फटका केवळ काँग्रेसलाच बसला नाही तर त्यांचा सहकारी असलेल्या उबाठाला देखील बसला.   

वित्तपुरवठा व मीडिया कॉर्डिनेशन
वित्तपुरवठा यात काँग्रेस मागे पडली. काही उमेदवारांनी निवडणुकीत अमाप पैसा खर्च केला. मात्र काही उमेदवारांना आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ देखील मिळू शकलं नाही. काँग्रेसतर्फे नेतृत्त्वाचा कोणताही चेहरा नसल्याने याबाबत उमेदवारांना कुणाकडे मदतही मागता येत नव्हती. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार जोमात हवा करीत होते. याचा केवळ मतदारांवरच नाही तर काँग्रेस उमेदवारांच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला. परिणामी प्रचारात असमतोल निर्माण झाला आणि अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कमकुवत स्थितीत दिसून आले. त्याचप्रमाणे काँग्रेसचं मीडिया कॉर्डिनेशन पूर्णपणे विस्कळीत होतं. कोणत्याही मीडियाचा पुरेसा वापर काँग्रेसने केला नाही किंवा मीडियाच्या वापरासाठी कोणतीही ठोस रणनीती आखण्यात आली नाही. सुरुवातीपासून मीडियात काँग्रेस कुठं ही नसल्यानं काँग्रेस उमेदवारांची हवा अखेर पर्यंत झालीच नाही.

वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा संघटनात्मक कमकुवतपणा, गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वाच्या अस्पष्टतेचा थेट परिणाम होता. पारंपरिक मतांचा आधार असूनही काँग्रेसला विजय मिळवता आला नाही, कारण त्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली रणनीती, एकसंघ नेतृत्व आणि प्रभावी प्रचार यांचा पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांसह पारंपरिक मतदारांचा देखील विश्वास डळमळीत झाला. याचा भाजपने पुरेपुर फायदा घेतला. कधीकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या वणीत आता भाजपनं आपले पाय मतबूत केले आहे. ही केवळ काँग्रेसची एका निवडणुकीची हानी नाही, तर काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना आहे.

वणीची निवडणूक काँग्रेससाठी एक आरसा ठरली आहे. पारंपरिक मतांचा आधार पुरेसा नसतो; त्यांना जपण्यासाठी जनसंपर्क, संघटनात्मक एकजूट, स्पष्ट नेतृत्व, आधुनिक प्रचारयंत्रणा आवश्यक असते. अन्यथा गडही हातातून निसटतो आणि पराभव दूरगामी ठरतो. हेच या निवडणुकीत दिसून आले.
“काग़ज़ों पर बहुत मजबूत थे हम भी कभी,
मैदान में उतरे तो हक़ीक़त ने आईना दिखा दिया।”

(पुढील भाग लवकरच…) (भाग 1, भाग 2 व भाग 3 खालील लिंकवर)

शिवसेना उबाठाच्या तोंडचा घास भाजपने पळवला ?

भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? का मिळालं बम्पर यश ?

विजयापेक्षा पराभवाची चर्चा ! वणीमध्ये शिंदेसेना का अपयशी ठरली?

Comments are closed.