वणी भाजपच्या विजयामागचे कुशल रणनीतीकार: ऍड. नीलेश चौधरी
राजकारणाची पाटी कोरी, थेट शहराध्यक्ष पद... अवघ्या 4 महिन्याचा अनुभव - काय आहेत यशाची सूत्रे?
निकेश जिलठे, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेला दणदणीत विजय हा केवळ योगायोग नसून, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या झंझावाती आणि आक्रमक नेतृत्वाचा स्पष्ट परिणाम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची प्रामाणिक साथ ही या विजयाची उघड कारणे आहेत. मात्र या विजयाच्या पटलामागे एक कुशल व्यवस्थापकाची शांत पण प्रभावी रणनीती सातत्याने कार्यरत होती. ते नाव म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष ऍड. नीलेश चौधरी ! शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ज्ञ ते भाजपच्या निवडणुकीचे रणनीतीकार असा त्यांचा प्रवास आहे. संजीवरेड्डी यांनी यंदा निवडणुकीत प्रचारयंत्रणेची पूर्ण सूत्रे ऍड. नीलेश चौधरी यांच्या हाती दिली होती. चौधरी यांनी भाजपच्या प्रचार मोहिमेला धार दिली. शिस्त, नियोजन आणि आक्रमक रणनीतीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण प्रचाराला वेग दिला. विरोधकांची प्रत्येक चाल आधीच ओळखून त्यावर मात केली आणि भाजपच्या विजयाला निर्णायक वर्चस्वाचे स्वरूप प्राप्त करून दिले.
ऍड. नीलेश चौधरी यांचा राजकीय प्रवास अवघ्या चार महिन्याआधी सुरु झाला. राजकीय प्रवास सुरू होण्याआधी ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वणी शहरातील सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय होते. एक तरुण, अभ्यासू आणि वकिली व्यवसायामुळे नीलेश चौधरी यांची शहरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने चिंतन करत नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. या निवडणुकीसाठी पक्षाला केवळ राजकीय चेहरा नव्हे, तर संघटन उभं करणारा, सर्वांना सोबत घेणारा आणि वादविरहित इमेज असलेला नवा शिलेदार हवा होता. पक्षातील कुणाचाही विरोध असू नये यासाठी बोदकुरवार यांच्या द्वारे काही सर्वसमावेशक नावांची चाचपणी करण्यात आली. या प्रक्रियेत एक नॉन-पॉलिटिकल, मात्र प्रभावी नाव समोर आले— ते नाव म्हणजे ऍड. नीलेश चौधरी !
राजकारणाची पाटी कोरी असली, तरी सामाजिक भान, राजकीय जाण व अभ्यास आणि संघटनात्मक समज त्यांच्या कडे होती. हे अचूक हेरत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वासारखे धक्कातंत्राचा वापर केला. त्यांनी ऍड. नीलेश चौधरी यांच्यावर थेट भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली—हा निर्णय पुढे जाऊन भाजपच्या निवडणूक रणनितीतील टर्निंग पॉइंट ठरला.
ऍड नीलेश चौधरी यांचा परिचय
ऍड. नीलेश चौधरी हे मुळचे मारेगाव तालुक्यातील गाडेगाव येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण वणी येथील बालविद्या मंदिर येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, वणी येथे पूर्ण केले. पुढे वणीच्या लोटी महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. कायद्याची आवड आणि सामाजिक प्रश्नांची जाण यामुळे त्यांनी चंद्रपूर येथील एस.पी. महाविद्यालयातून एल.एल.बी.ची पदवी घेतली. याच महाविद्यालयातून पुढे त्यांनी संविधान या विषयात एल.एल.एम. पूर्ण केले. सन 2004 मध्ये त्यांना वकिलीची सनद प्राप्त झाली. तेव्हापासून ते सातत्याने वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. न्यायालयीन कामकाजातील अनुभव, कायद्याचा सखोल अभ्यास आणि संविधानात्मक जाण यामुळे शहरातील एक अभ्यासू आणि विश्वासार्ह विधिज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
विद्यार्थी चळवळीतून राजकारणाची पायाभरणी
ऍड. नीलेश चौधरी यांचा राजकारणाशी परिचय हा थेट विद्यार्थी चळवळीतून झाला. लोटी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यापीठ प्रतिनिधी (यूआर) पदाची निवडणूक लढवली आणि ती जिंकून दाखवली. त्यानंतर एस.पी. महाविद्यालयातही त्यांनी यूआर म्हणून निवडून येत आपली नेतृत्वक्षमता सिद्ध केली. यूआर पदाच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आला. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडल्या, हक्कांसाठी आवाज उठवला आणि संघटन कौशल्य दाखवले. याच काळात त्यांचा राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध आला. मात्र पद, प्रसिद्धी किंवा सत्तेच्या मोहात न अडकता त्यांनी पुढील काळात आपले संपूर्ण लक्ष वकिली व्यवसाय आणि सामाजिक कार्यावर केंद्रित केले.
प्री इलेक्शन मायक्रो प्लानिंग
विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच भाजप नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली. मार्च महिन्यामध्ये माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ऍड नीलेश चौधरी यांची भेट घेत त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची विनंती केली. जुलै महिन्यात त्यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. नगरपालिकेच्या तयारीसाठी वेळ कमी होता. त्यातच विधानसभेच्या भाजपच्या पराभवानंतर आलेल्या रुसव्या फुगव्यामुळे काही कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षापासून नाराज होत काहीसे दूर झाले होते. त्यांना पुन्हा पक्षात ऍक्टिव्ह करण्याची जबाबदारी नीलेश चौधरी यांच्यावर होती. सर्वप्रथम त्यांनी अशा कार्यकर्त्यांची गृहभेट घेतली. त्यांच्यातील रुसवे, फुगवे दुर करत त्यांना पुन्हा पक्षात ऍक्टिव्ह केले. तसेच त्यांची नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत पक्षाच्या विविध सेलची नव्याने रचना केली. या रिफॉर्मेशनचा पुढे पालिका निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.
जसे निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपचे समर्थक व काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तशीच नाराजी शिवसेना उबाठाच्या विजयानंतर अपेक्षा पूर्ण न झाल्याने महाविकास आघाडीच्या काही समर्थक व हितचिंतकांमध्येही होती. नीलेश चौधरी यांनी असे समर्थक, हितचिंतक टारगेट केले. यात उच्चशिक्षित, अभ्यासू, विविध क्षेत्रात कार्यरत व शहरातील सुपरिचित व्यक्तींचा होता. तसेच जो समाज विधानसभेत भाजपपासून दूर राहिला अशा समाजातील व्यक्तींशी देखील संपर्क साधला. यातील काहींना त्यांनी थेट पक्षाशी जोडले तर जी व्यक्ती राजकारणापासून दूर राहण्यास इच्छुक होती त्यांना भाजपच्या विविध सेलमध्ये जोडले.
पारंपरिक मत खेचण्याचं आव्हान
मुस्लिम, बुद्धीस्ट व आदिवासी समाजातील मतदान हे महाविकास आघाडीचे पारंपरिक मतदान मानले जाते. या मतांना खेचण्यासाठी त्यांनी त्या समाजातील सुपरिचित व्यक्तींची मदत घेत त्यांना सोबत घेतले. दलित वस्ती, मुस्लिम वस्तीत विविध उपक्रम व दौरे आयोजित करण्यात आले. तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या दूर करण्याचे वचन दिले. जात, धर्माच्या राजकारणाला फाटा देत तेथील लोकांना विकासाचे मॉडेल समजावून सांगितले. या मतदारांसाठी वेगळी वेगळी टिम ठरवण्यात आली होती. निवडणूक काळात सर्वाधिक लक्ष भाजपने मुस्लिम, दलित वस्तीत दिले. सातत्याने होणारा जनसंपर्क व विकासाचे वचन यामुळे विरोधी पक्षाचा पारंपरिक मतदार भाजपकडे गेला.
निवडणूक काळातील व्यवस्थापन
निवडणूक जाहीर होताच प्रचाराची दिशा ठरवणे, प्रभागनिहाय रणनीती आखणे, बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, प्रचाराचे रोजचे वेळापत्रक निश्चित करणे आणि त्यावर सातत्याने पाठपुरावा करणे – या सर्व बाबींमध्ये ऍड. नीलेश चौधरी यांची भूमिका निर्णायक ठरली. प्रचार केवळ रॅली आणि कॉर्नर सभांपुरता मर्यादित न ठेवता, गृहभेटी, बूथ बैठक, प्रभावी व्यक्तींशी संवाद अशा सर्व पातळ्यांवर तो पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला. रोजच्या प्रचाराचे काटेकोर नियोजन एक दिवस आधीच तयार केले जायचे. प्रत्येक प्रभागात प्रचार प्रभारींची टीम उभी करून त्यांच्या कडून रोज पाठपुरावा घेणे, येणाऱ्या अडचणी सोडवणे – या सर्व गोष्टींमध्ये चौधरी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच प्रचार केवळ उमेदवारांपुरता मर्यादित राहिला नाही, तर बूथस्तरीय कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
पॉकेट टार्गेटिंग आणि एकसंघता
भाजपने संपूर्ण निवडणूक काळात ‘पॉकेट्स’ आधारित प्रचारावर भर दिला. वय, व्यवसाय, महिला, युवक, विशिष्ट भाग आणि प्रभावशाली मतदार गट असे विविध पॉकेट्स ओळखून त्याची अचूक रणनिती आखली. वय, जात, धर्म, व्यवसायानुसार मतदारांचे पॉकेट्स ओळखून त्यांच्यासाठी विशेष बैठका आणि प्रचार आयोजित केला गेला. युवक हे मोठ्या प्रमाणात भाजपचे व्होटर असल्याने ते दुरावू नये म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. पक्षातील छोट्या कार्यकर्त्यापासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांना एकत्र बांधण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले. ज्याचा थेट परिणाम मतदारांवर सकारात्मक छाप पाडण्यात झाला.
मीडियाचा पुरेपुर वापर
नीलेश चौधरी हे मीडिया फ्रेंडली राजकारणी आहेत. त्यांना निवडणूक काळात मीडियाच्या भूमिकेचे महत्त्व चांगेलच माहिती आहे. त्यांच्या नियोजनात मीडिया कॉर्डिनेशनला विशेष महत्त्व देण्यात आले. स्थानिक न्यूज पोर्टल्स, यूट्यूब, सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांद्वारे भाजपच्या प्रचाराला नियमित प्रसिद्धी मिळाली. मीडिया कॉर्डिनेशनच्या बाबतीत भाजप ही इतर सर्व पक्षा पेक्षा फार पुढे होता. भाजपच्या रॅली, सभा, विकासकामे आणि उमेदवारांच्या मुलाखतींना मोठे कव्हरेज मिळाले, ज्याने प्रचाराला व्यापक व्याप्ती मिळाली. कार्यकर्तेही या प्रसिद्धीमुळे अधिक चार्ज होऊन काम करू लागले. तर मतदारांमध्येही यामुळे हवा तयार झाली.
वणी नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात ऍड. नीलेश चौधरी यांच्या व्यवस्थापनाचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्या कुशल व्यवस्थापन व रणनितीमुळे पक्षाचा प्रचार सुरुवातीपासून आघाडीवर राहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत तीव्रता टिकवली गेली.
आता भाजप जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागला असून, या संपूर्ण मोहिमेचे नियोजन मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या प्रचारातही ऍड. नीलेश चौधरी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नगरपालिकेत निर्माण झालेली ‘जादू’ जिल्हा परिषदेतही पुन्हा अनुभवता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(निवडणुकीच्या इतर भागाचे खालील लिंकवर विश्लेषण)
विजयापेक्षा पराभवाची चर्चा ! वणीमध्ये शिंदेसेना का अपयशी ठरली?



Comments are closed.