सुशील ओझा, झरीः 13 दिवस ती चालली. 13 दिवसानंतर तिच्यातले ‘‘जीवन’’ संपले आणि ती बंद झाली. आधी तेरवी झाली नि मग जीव गेला अशी झरी येथील पाणपोईची अवस्था झाली. हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तहसील कार्यालय ,पंचायत समिती,कृषी कार्यालय ,बँक, शिक्षण कार्यालय, भूमी अभिलेख, सब रजिस्टर कार्यालय, ट्रेजरी, न्यायालय व इतर कार्यालय असून तालुक्यातील १०६ गावांतील शाळकरी मुलांपासून तर वयोवृद्ध जनता कार्यालयीन कामकाजाकरिता येथे येतात . बसस्थानकावर किंवा इतर कुठेही पिण्याकरिता जनतेला पाणी नाही .बहुतांश लोकांना पाणी विकत घेऊनच प्यावे लागते
बाहेरून येणाऱ्या जनतेला पाण्याकरिता भटकावे लागते. पाण्याकरिता पैसाही खर्च करावे लागत आहे. अशातच येथील एका संघटनेने पाणपोई सुरू केली. मोठा गाजावाजा करून तहसीलदार, गटविकास अधिकारी व काही राजकीय लोकांना बोलावून उदघाटन केले. 13 दिवसांतच ही पाणपोई बंद झाली. पुन्हा लोकांचे मोठे हाल सुरू झाले. कारण पाणपोईजवळील काही पानटपरीचालकांनी पाणी पाऊच व पाण्याची बाटल्या पाणपोई सुरू झाल्याने ठेवणे बंद केले. ज्यामुळे जनतेला पाण्याकरिता भटकावे लागत आहे .संघटनेने १३ दिवस १० कॅनच्या हिशोबाने १३० कॅन्स घेतल्यात. परंतु पाण्याचे पैसे न दिल्याने पाणपोईवर कॅन्स देण्याचे बंद केल्याची माहिती मिळाली .
१३ दिवस पाणी म्हणजे तेरवी केली काय असेही जनता चर्चा करीत आहे .सदर संघटनेने अधिकारी व राजकीय लोकांना बोलावून पाणपोईचे उद्घाटन कोणत्या हेतूने सुरू केले हे कळत नसून लोकंात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी याच पाणपोईच्या सावलीत भाजीपाला विक्रेते बसून भाजीपाला विकतात हे विशेष.