चिप बसवून लबाडी करणारे पेट्रोलपंप होणार बंद
ग्राहकांची लूट करणा-या पेट्रोलपंप चालकांवर होणार कारवाई
नागपूर: पेट्रोलपंपांवर चिप बसवून ग्राहकांची लुबाडणूक करणारे पेट्रोलपंप कायमस्वरूपी बंद करण्यात येतील, अशी माहिती अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली. ज्या चालकांनी चिप बसवून ग्राहकांची फसवणूक केली आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असून. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गिरीश बापट यांनी नागपूरमध्ये अन्न व पुरवठा विभागाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी घेतली. नागपूर विभागातील 55 प्रकरणांचा निपटारा त्यांनी केला. कमी पेट्रोल देऊन पेट्रोलपंप संचालकांकडून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. यासाठी काही पंपावर चिप लावण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या गुन्हे शाखेने हा प्रकार उघडीस आणला.
राज्यभर अशा पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत कोट्यवधींची लूट केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याकडे लक्ष वेधल्यानंतर गिरीश बापट यांनी गुन्हे शाखेच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर लुबाडणूक करणाऱ्या पेट्रोलपंपाचे परवाने रद्द केले जातील आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक दुकानात बायोमेट्रिक सेवा लावण्यात येत आहे. राज्यातील 52 हजार दुकानांपैकी 44 हजार दुकानांत ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन पेमेंटही देण्यात येणार असून त्याचे ट्रेनिंग अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. मुंबई व रायगडमध्ये महिन्यात ही व्यवस्था सुरू येणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.