नागपूर: राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. इथल्या धरणांमध्ये केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी टंचाईची झळ बसू शकते.
पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर व नाशिक विभागात नाशिक व नगरमधील धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर आहे. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोकणात धरणांमध्ये ८४ टक्के व पुणे विभागात ५२ टक्के पाणीसाठा आहे.
नागपूर व अमरावती विभागातील प्रकल्पांत केवळ सुमारे २० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी २२ जुलैला विदर्भातील धरणांमध्ये ३० टक्के साठा होता. चंद्रपूरच्या तोतलडोह (१०%), भंडाऱ्याच्या गोसीखुर्द (१०%), यवतमाळच्या इसापूर (४%) या प्रकल्पांमध्ये पाण्याची स्थिती फारशी चांगली नाही.
नाशिकमधील गंगापूर धरण ७५ टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर पुण्यातील खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे सर्व ११ दरवाजे शनिवारी उघडण्यात आले.
मराठवाड्यातही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गंगापूर धरणातून दोनवेळा विसर्ग केल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण २३ टक्के भरले आहे. इतर प्रमुख धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. बीड जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झालेला नाही.