ईजासनच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करा
ग्रामस्थांची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी
तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या मनमानी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. परिणामी सदर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली आहे.
वणी तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथील सरपंच बाबाराव बन्सी धनकसार यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचे वितरण आहे. मात्र ते शासकीय नियमानुसार धान्याचे वितरण करीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. धान्य वाटप कमी प्रमाणात करून शासकीय दरापेक्षा अधिक दर आकारतात. मागील महिन्यात न सोडवलेले धान्य पुढील महिन्यात देत नाही. धान्य घेतल्यावर पावती देत नाही. दुकानात धान्य भाव फलक लावल्या जात नाही. लोकांनी विचारणा केल्यास अरेरावीची भाषा वापरली जाते.
सदर दुकानदाराच्या मनमानी कारभाराची तक्रार दक्षता समिती, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. म्हणून सदर धान्य दुकानातील त्रुटींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली आहे.
निवेदनावर पवन गोवारदिपे, लक्ष्मण कुमरे, शर्मिला वरखडे, संदीप बलकीस सुकेशना मेश्राम, लंका कनाके, संचिता बलकी, पंचफुला टेकाम, निर्मला आत्राम, केतू कुमरे यांची सही आहे.