महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 200 रुग्णांची तपासणी

धामणी (खडी) येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

0
कारंजा: तालुक्यातील धामणी (खडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दिनांक 11 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत घेण्यात आले. यात परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवर रुग्णांची तपासणी केली. संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल, दिग्रस तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या वेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजने बद्दल यथोचित मार्गदर्शन केले तसेच आपल्या आरोग्याची निगा कशी राखावी व आरोग्यमय जीवन शैली कशी अंगिकारावी याविषयी मार्गदर्शन केले.

महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत होणा-या या शिबिरात पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहे. यात 971 प्रकारच्या आजार व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाणार आहे.
पाच टप्प्यात होणा-या या शिबिराचा पहिला टप्पा हा प्राथमिक आरोग्य केंद्र खडी धामणी पार पडला. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पोहा, प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा, प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा, प्राथमिक आरोग्य केंद्र धनज येथे होणार आहे. या शिबिरात प्रत्येक रोग आणि आजारांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांना पुढील उपचार दिले जाणार आहे.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. श्याम जाधव (नाईक), डॉ.संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. श्रीकृष्ण पाटील यांनी परिश्रम घेतले.
Leave A Reply

Your email address will not be published.