नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरणार्या साडेपाच लाखांहून अधिक लोकांना लवकरच प्राप्तिकर विभागाकडून फोन येण्याची शक्यता आहे. ज्यांनी आपल्या सर्व बँक खात्यांचा अजूनही खुलासा केलेला नाही, अशा एक लाख लोकांवरही प्राप्तिकर विभागाचे लक्ष आहे. ‘ऑपरेशन क्लीन मनी’च्या दुसर्या टप्प्यात प्राप्तिकर विभाग ज्या लोकांचे उत्पन्न आणि त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशांचा मेळ बसत नाही, अशांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आमच्याकडे संशयास्पद व्यवहारांची नवी माहिती आली आहे. ज्यांचे कर विवरण पत्र जमा केलेल्या रोख रकमेशी मेळ खात नाही, अशा साडेपाच लाखांहून अधिक लोकांना इ-मेल आणि एसएमएस पाठवणे सुरू केल्याचे, कें द्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी अधिक जोखीमवाले क्लस्टर्स, बनावट कंपन्या, बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी डेटा अँनालिस्टची मदत घेत आहेत. ऑपरेशन क्लीन मनी अंतर्गत ज्यांनी आपल्या सर्व बँक खात्यांचा खुलासा केला नव्हता, अशा एक लाखांहून अधिक व्यक्तींची ओळख पटवण्याची प्रक्रियाही प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे.
विभागाने पहिल्या टप्प्यात १७.९२ लाख व्यक्तींची ओळख पटवली होती. यातील ९.७२ लाख लोकांनी आपले उत्तर ऑनलाईन दिले आहे. यासाठी प्राप्तिकर विभागाने आपल्या वेबसाईटवर पॅन धारकाला इ-फायलिंग विंडोही दिली आहे. अशा पद्धतीने रक्कम भरणारे ऑनलाईन स्पष्टीकरण देऊ शकतात. नोटाबंदीच्या काळात दोन लाखांहून अधिक रोख रक्कम भरणार्यांना या वर्षी प्राप्तिकर विवरण पत्र भरताना याची माहिती द्यावी लागणार आहे. प्राप्तिकर विभाग आपल्याकडील माहिती बरोबर ही माहिती जुळते का? किंवा यामध्ये गडबड आहे का? याची चाचपणी करणार आहे.