तात्काळ तिकीट बुक करा, पैसे 14 दिवसांमध्ये भरा

आधी साध्या रिजर्वेशनला उपलब्ध होती सुविधा

0 719

नवी दिल्ली: ‘आयआरसीटीसी’ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणार्‍या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पयार्याचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणार्‍या प्रवाशांनाही करता येईल. यामुळे तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतर पैसे भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. ‘ईपेलेटर’च्या माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येणार आहे.

रेल्वेत दररोज तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी १ लाख ३0 हजार व्यवहार केले जातात. तात्काळ तिकीटाचा कोटा सुरु होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये हे व्यवहार होतात. एसी क्लाससाठी सकाळी १0 वाजता तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू होते. तर नॉन एसीसाठीचे तात्काळ तिकीटांचे आरक्षण ११ वाजता सुरू होते. प्रवासाच्या एक दिवसआधी तात्काळ तिकीटांचे बुकिंग सुरू होते. तात्काळ तिकिटाच्या बुकिंगवर कोणतीही सवलत दिली जात नाही. मात्र आता तात्काळ तिकीट आरक्षित करणार्‍या प्रवाशांना ‘ईपेलेटर’मुळे पेमेंट करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळेल. याशिवाय ‘पे ऑन डिलेव्हरी’चा पर्यायदेखील उपलब्ध होईल. ईपेलेटर सुविधेमुळे तिकीट आरक्षित केल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत पेमेंट करता येईल. यामुळे तिकीट आरक्षित करण्यास काही सेकंदांचा अवधी लागेल.

कशी आहे तिकीट बुक करण्याची पद्धत ?
सध्या ज्याप्रमाणे तिकीट आरक्षित केले जाते, तसेच तिकीट ईपेलेटर अंतर्गत आरक्षित करावे लागेल. मात्र पेमेंट करताना ईपेलेटरचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंटची लिंक देण्यात येईल आणि तुमचे तिकीट आरक्षित होईल. जर तुम्ही पहिल्यांदा ईपेलेटरचा वापर करत असाल, तर यासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणीवेळी पॅन अथवा आधार कार्ड क्रमांक यांच्यासह वापरकर्त्याला स्वत:ची माहिती भरावी लागेल. यानंतर प्राप्त झालेल्या पेमेंट लिंकच्या आधारे १४ दिवसांच्या मुदतीत कधीही पेमेंट करता येईल.

Comments
Loading...