मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला नागरिकांनी
तुलनेने पार्थिव गणेशाकडे लोकांचा कल
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः गणपतीची मूर्ती ही मातीचीच हवी हा आग्रह या वर्षी अनेकांनी धरला. त्यामुळे जागृत नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी मातीच्याच मूर्ती आणल्यात. स्थानिक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था ही ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या उपक्रमसाठी झटत आहे. नागरिकांचाही याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
मूर्तिकलेच्या प्रशिक्षक प्रा. डॉ. मंजूषा वाठ यांनी या वर्षात तीन ऑनलाईन वर्कशॉप्स घेतलेत. मंजिरी शेखावत आणि प्राचार्या प्रज्ञा वनकर यांच्या सहकार्याने विद्याभारती कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप झालं. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेसाठीदेखील वर्कशॉप झालं. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन्सविंगनेदेखील हे वर्कशॉप घेतलं.
दरवर्षी शाळा, कॉलेजेस आणि विविध वस्त्यांमध्ये ही वर्कशॉप्स झालीत. लॉकडाऊनमुळे या वर्षी मात्र सर्व वर्कशॉप्स ऑनलाईन झालीत. त्यामुळे जगभरातील लोकांनी याचा लाभ घेतला. डॉ. वाठ म्हणाल्यात, की सर्वांना मातीच्या मूर्ती प्रोव्हाईड करणं कठीण असतं. त्यामुळे लोकांनीच स्वतः मूर्ती बनवाव्यात यावर त्यांच्या टीमने काम केलं. केवळ सांगून होत नाही, पर्याय देणं आवश्यक असतं. आमच्या टीमने हा पर्याय दिला.
आमची टीम शेकडो गणेशमंडळाना यासंदर्भात जागृत करते. पर्यावरणपूरक मूर्ती बसवण्याचा आग्रह करते. या टीमचं मुख्य लक्ष्य हे सार्वजनिक गणेशमंडळ आहे. कारण ह्या मोठ्या मूर्तीदेखील नदीतच विसर्जित होतात. नव्या पिढीत ही जागृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये आम्ही वर्कशॉप्स घेतो.
मातीच्या मूर्ती आम्ही विकत आणून त्याचा स्टॉल लाावतो. कॉलेजेसचे विद्यार्थी यात स्वयंसेवक असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर हे विद्यार्थी आपापल्या गाावांत हा उपक्रम राबवतात. संस्थेने आणखी एक नवा प्रयोग केला. मूर्तीचं विसर्जन एखाद्या भांड्यात करावं. ती माती पुढील वर्षासाठी जपून ठेवावी.
संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अंजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वऱ्हेकर, सचिव डॉ. जयंती वडतकर, कोषाध्यक्ष डॉ. गजानन वाघ आणि पूर्ण टीम पर्यावरणपूरक गणपतीसाठी काम करीत आहे. संस्थेचे सचिव जयंत वडतकर म्हणालेत की, यावर्षी सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी स्टॉलची जागा बदलवली. तरीदेखील प्रतिसाद चांगलाच राहिला. मूर्ती मातीचीच हवी हा विचार रुजवण्यात त्यांची टीम बऱ्यापैकी यशस्वी वाटचाल करीत आहे.