जयंत सोनोने, अमरावती: गोगलगाय आणि पोटात पाय, अशी म्हण आहे. आता गोगलगाय (शंखी) हाच कीटक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक परिसरात गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळत असून तिचा वावर शेतक-यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. संत्रा, सोयाबीन, कपाशी, केळी आदी पीक शंखी गोगलगायने उद्ध्वस्त केले आहे.
तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून औषधी फवारणीला ती जुमानत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नशिबाला चिकटलेल्या गोगलगायीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांचे पथक अमरावती जिल्ह्यात आले. शेतकऱ्यांसमक्ष प्रात्यक्षिके झालीत; मात्र गोगलगायीला शेताबाहेर काढण्यासाठी मंदीत शेतकऱ्यांच्या खिशाला चुना लागत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
कधी न दिसणारी गोगलगाय पावसाळ्यात मात्र रस्त्यावर माळावर, शेतात मुक्त संचार करते. संचार करण्याइतका चंचलपणा तिच्यात नसला तरी तिचे अस्तित्व व रात्री तिच्या हालचाली बघणाऱ्याला डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. परिसरात सध्या गोगलगायींचे अस्तित्व मोठया प्रमाणात दिसून येत आहे. अनेक शेतांत या गोगलगायींनी धुमाकूळ घातला आहे. अतिशय संथ वृत्तीची ही गोगलगाय असली तरी शेतकरीवर्गासाठी मोठी धोकादायक आहे.
पावसाळ्याव्यतिरिक्तसुद्धा ती इतर ऋतूंमध्ये कॅनल, जलयुक्त शिवार बंधारे, नाले, तलावात, नदीतही आढळून येते. अनेक परिसरातील संत्रा, सोयाबीन, कपाशी, केळी आदी पिकं शंखी गोगलगायीने उद्ध्वस्त केली आहेत. गोगलगाय एका जागी निपचित पडली, की तिथेच चिकटून बसते. या निरूपयोगी प्राण्यांचा उपद्रव वाढला असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. परिसरातील अनेक शेतक-यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे.
जून ते सप्टेंबर पर्यंत असते सक्रीय
गोगलगायीला (शंखी) जिवंत राहण्यासाठी ओलाव्याची गरज असते. त्यामुळे गोगलगाय फक्त जून ते सप्टेंबर महिन्यातच आपल्याला जास्त सक्रिय दिसेल. इतर वेळेस ती निष्क्रिय म्हणजे शांत असते. याचा अर्थ असा, की वातावरणात भरपूर कालावधीपर्यंत ओलावा निर्माण झाला नाही तर गोगलगाय झोपलेल्या अवस्थेतच राहते. गोगलगायीचे आणखी एक आश्चर्य सांगायचे झाले तर एवढीशी दिसणारी गोगलगाय २५ वर्ष जगते. गोगलगाईचे शरीर हे मऊ व चिकट असते. गोगलगाईला पाय नसल्याने तिच्या शरीरातून निघणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या स्त्रवामुळे तिला पुढे सरकण्यास मदत होते. यामुळे तिचे मोलस्क या प्राणीवर्गात वर्गीकरण केले जाते.
म्हणून फवारणीचा उपयोग होत नाही
शंखीच्या नाजूक शरीराच्या संरक्षणासाठी त्यांना जन्मजात एक कठीण शंख असतो. जेव्हा त्यांना धोका जाणवतो, तेव्हा ते लगेच त्यांचे शरीर या संरक्षक कठीण शंखाच्या आत ओढून घेतात. प्रखर उन्हाळ्यात अथवा अतिशय गरम वातावरणातसुद्धा या गोगलगायी त्यांचे शरीर या शंखाच्या आत ओढून घेतात आणि त्याचे दारसुद्धा झाकणाद्वारे बंद करतात. यामुळे त्यांचे ओले शरीर गरम वातावरणामध्ये सुकण्यापासून वाचते. सूर्यप्रकाशाशी वावडे असल्यामुळे बहुतांश गोगलगायी या निशाचर असतात. रात्री किंवा ढगाळ वातावरणात त्यांचा वावर जास्त असतो. त्यामुळे शंखीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी फवारणी करतात मात्र त्यांच्या शरिराच्या बनावटीमुळे त्यांच्यावर तिळमात्र उपयोग होत नाही.
मागील तीन चार वर्षापासून परिसरात मोठ्या प्रमाणात गोगलगाय (शंखी)चा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कपाशी, संत्रा, सोयाबीन आदी पिकांना पूर्णता उध्दवस्त करत आहे. औषध फवारणीचा शंखीवर उपयोग होत नाही. त्यामुळे शेतीचे महत्वाची कामे सोडून शंखी वेचून शेताबाहेर टाकण्यासाठी मजुर सांगण्यावी वेळ आली आहे.
–अजय तऱ्हेकर, शेतकरी बेलमंडळी
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भात वाढत असतांना पिकांचे संगोपन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. या संदर्भात कृषी विभागाला निवेदन दिल्यावर औषध उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र ते निरुपयोगी ठरले. कोरोना संकटात कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांने पेरणी केली. शंखीमुळे डोळ्यादेखत पिकामागून पिकं नष्ट होत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाय होणे आवश्यक आहे.
– मंगेश देशमुख, शेतकरी
मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे गोगलगायींसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे याकरिता शास्त्रज्ञांनी दोन शिवार भेटी दिल्या आहेत. कृषी विभागाकडून शंखी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना काही प्रात्यक्षिकं करुन दाखविलीत. स्नेलकिल नामक औषध उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
– अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी, चांदुर बाजार